ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगड
“समुद्राच्या लाटांवर रोबोट स्वार; बुडणाऱ्यांचे वाचणार प्राण… पण जीव रक्षकांच्या मानधनाचा प्रश्न कायम!”
रायगड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत नागावमध्ये आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षणाचे आयोजन

सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
अलिबाग |
समुद्रात बुडणाऱ्या व्यक्तींच्या मदतीसाठी नागाव बीचवर अत्याधुनिक रोबोटिक वॉटर रेस्कु क्राफ्ट तैनात करण्यात येत आहे. काही सेकंदांत बुडणाऱ्या व्यक्तींपर्यंत पोहोचून त्यांना सुरक्षित किनाऱ्यावर आणण्याची क्षमता असलेली ही हायटेक यंत्रणा रायगड जिल्ह्यातील निवडक समुद्रकिनाऱ्यांवर सुरू होत असून, नागावचा त्यात समावेश हा अभिमानाचा विषय मानला जात आहे. ही यंत्रणा पूर्णपणे स्वयंचलित असून रिमोट कंट्रोलद्वारे सहज ऑपरेट करता येते, त्यामुळे समुद्रातील आपत्कालीन प्रसंगात बचावकार्याचा वेग आणि अचूकता दोन्ही वाढणार आहेत.

मात्र, या हायटेक सुविधेसोबतच एक महत्त्वाचा प्रश्न पुढे आला आहे. लाईफगार्ड्सच्या मानधनाचा. रोबोट्स ऑपरेट करण्यासाठी तसेच प्रत्यक्ष आपत्कालीन परिस्थितीत मदत करण्यासाठी प्रशिक्षित लाईफगार्ड्स आवश्यक असतानाही त्यांच्या मानधनाबाबत ठोस व्यवस्था नसल्याने स्थानिक पातळीवर नाराजी व्यक्त होत आहे. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून काही प्रमाणात आर्थिक मदत मिळावी किंवा ग्रामपंचायत आणि प्रशासन यांच्या संयुक्त (shared model) योजनेतून खर्च उचलण्यात यावा, अशी मागणी नागावच्या सरपंच हर्षदा मयेकर यांनी केली आहे.
दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत रायगड जिल्हास्तरीय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षणात पोलीस यंत्रणा, किनारी ग्रामपंचायत प्रतिनिधी आणि सुरक्षा कर्मचारी सहभागी झाले होते. नागाव ग्रामपंचायतीतर्फे स्थानिक टीमने सहभाग घेत प्रशिक्षण पूर्ण केले. प्रशिक्षणादरम्यान पूरस्थितीतील बचावकार्य, समुद्रातील आपत्कालीन प्रसंग, बुडणाऱ्या व्यक्तींचे रेस्क्यू तंत्र, सर्पदंशावरील प्राथमिक उपचार तसेच फर्स्ट एड आणि आपत्कालीन किट्स याबाबत सविस्तर मार्गदर्शन आणि प्रात्यक्षिके देण्यात आली.

नागाव बीचवर ‘रोबो रक्षक’ तैनात होणे ही निश्चितच मोठी पायरी असली तरी केवळ तंत्रज्ञानावर अवलंबून न राहता प्रशिक्षित मनुष्यबळ आणि त्यांचे योग्य मानधन याकडेही तितक्याच गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. रोबोट्स आलेत, मात्र आता प्रशासन लाईफगार्ड्सच्या प्रश्नाकडे कधी लक्ष देणार, हा सवाल उपस्थित होत आहे.

“अमेरिकेतून सुरू झालेली ‘रोबो रेस्क्यू’ची क्रांती”
______
रोबोटिक वॉटर रेस्क्यू तंत्रज्ञानाची सुरुवात 2001 साली अमेरिकेत झाली असून, EMILY (Emergency Integrated Lifesaving Lanyard) हा जगातील पहिला यशस्वी “रोबोट लाईफगार्ड” मानला जातो. Hydronalix या कंपनीने विकसित केलेल्या या यंत्रणेचा वापर समुद्रातील बुडणाऱ्या व्यक्तींना वेगाने मदत पोहोचवण्यासाठी करण्यात आला. पुढे 2012 मध्ये या तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष बचावकार्यामध्ये वापर सुरू झाला आणि त्यानंतर इराण, भारत, जपान यांसारख्या देशांनीही अशा प्रकारचे रेस्क्यू रोबोट विकसित केले. आज हे तंत्रज्ञान जागतिक स्तरावर समुद्रकिनाऱ्यांवरील सुरक्षेसाठी महत्त्वाचे साधन ठरत असून, त्याच तंत्रज्ञानाची पाऊलवाट आता नागावसारख्या किनाऱ्यांपर्यंत पोहोचत आहे.
….




