क्रीडाताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगड
क्रिकेटमध्ये आता ‘डेटाची बॅटिंग’; रायगडचा रोहित कार्ले महाराष्ट्र संघाच्या ‘ब्रेन टीम’मध्ये
खोपोलीच्या माजी क्रिकेटपटूची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या १९ वर्षांखालील मुलींच्या संघाच्या व्हिडिओ ॲनालिस्टपदी नियुक्ती

सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
अलिबाग |
आधुनिक क्रिकेटमध्ये सामने केवळ फलंदाजांच्या चौकार-षटकारांनी किंवा गोलंदाजांच्या विकेट्सने जिंकले जात नाहीत. डेटा, व्हिडिओ विश्लेषण आणि अचूक रणनीती हेही विजयाचे महत्त्वाचे सूत्र बनले आहे. अशा या आधुनिक क्रिकेटच्या ‘ब्रेन टीम’मध्ये रायगड जिल्ह्यातील खोपोलीचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू रोहित कार्ले यांची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) १९ वर्षांखालील मुलींच्या संघाच्या व्हिडिओ ॲनालिस्ट (चित्रफीत विश्लेषक) म्हणून नियुक्ती झाली आहे.
२०२६-२७ क्रिकेट हंगामात बीसीसीआयतर्फे आयोजित स्पर्धांसाठी रोहित कार्ले हा महाराष्ट्राच्या महिला संघासोबत काम करणार आहे. त्याने व्हिडिओ ॲनालिस्टचे प्रमाणित प्रशिक्षण पूर्ण केले असून, खेळाडूंच्या कामगिरीचे सखोल विश्लेषण, प्रतिस्पर्धी संघाच्या बलस्थानांचा आणि कमकुवतपणाचा अभ्यास, तसेच सामन्यादरम्यान रणनीती आखण्यासाठी तो महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.
आधुनिक क्रिकेटमध्ये व्हिडिओ ॲनालिस्ट हा प्रशिक्षक आणि कर्णधाराचा महत्त्वाचा रणनीतिक सहकारी मानला जातो. फलंदाज आणि गोलंदाजांच्या तांत्रिक त्रुटी शोधणे, प्रतिस्पर्धी खेळाडूंच्या सवयींचा अभ्यास करणे, क्षेत्ररक्षणाची आखणी, तसेच सामन्यानंतर खेळाडूंना व्हिडिओच्या माध्यमातून मार्गदर्शन करणे, अशी जबाबदारी या पदावर असते.
रोहित कार्ले याच्या या नियुक्तीमुळे रायगडच्या क्रिकेट क्षेत्राला मोठा सन्मान मिळाला आहे. त्याच्या निवडीबद्दल रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील, सचिव प्रदीप नाईक, सर्व पदाधिकारी, सदस्य आणि जिल्ह्यातील क्रिकेटप्रेमींनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
……



