ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगड
रिलायन्सच्या अधिकाऱ्याला धमकावल्या प्रकरणी नागोठणे पोलिसात तक्रार; पाच जणांवर गुन्हा दाखल

सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
नागोठणे |
रिलायन्स कंपनीच्या नागोठणे प्रकल्पातील डेप्युटी जनरल मॅनेजर रमेश धनावडे यांना शिवीगाळ, दमदाटी करून खोट्या विनयभंगाच्या तक्रारीची धमकी दिल्याप्रकरणी पाच जणांविरोधात नागोठणे पोलीस ठाण्यात 5 जून 2026 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कंपनीच्या इस्टेट कार्यालयात अनधिकृतपणे घुसून गोंधळ घालण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
याबाबत रमेश धनावडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, झोतीरपाडा परिसराकडे जाणाऱ्या नाल्याच्या साफसफाईचे काम प्रमोद रघुनाथ तरे यांना देण्यात आले होते. कंपनीच्या म्हणण्यानुसार, कार्यादेश देऊनही संबंधित काम वेळेत पूर्ण करण्यात आले नाही. याबाबत कंपनीकडून अनेकदा पाठपुरावा करण्यात आला होता. तसेच संबंधितांना कार्यालयात बोलावून काम पूर्ण करण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या.
दरम्यान, गुरुवारी सकाळी प्रमोद तरे यांना इस्टेट कार्यालयात चर्चेसाठी बोलावण्यात आले होते. मात्र ते उपस्थित राहिले नसल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. त्यानंतर दुपारी सुमारे बारा वाजण्याच्या सुमारास वरुणा प्रमोद तरे, रंजना तरे आणि सरिता पाटील या तिघी महिलांनी इस्टेट कार्यालयात अनधिकृतपणे प्रवेश करून धनावडे यांच्या केबिनमध्ये गोंधळ घातल्याचा आरोप करण्यात आला आहे.
त्या वेळी धनावडे हे त्यांच्या कॉर्पोरेट अफेअर्स विभागातील सहकाऱ्यांसोबत कार्यालयीन कामकाज करत होते. संबंधित महिलांनी आरडाओरडा, शिवीगाळ करत अंगावर धावून येण्याचा प्रयत्न केला. तसेच जीवे मारण्याच्या धमक्यांसह खोट्या विनयभंगाच्या तक्रारीत अडकविण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
याचवेळी राजेंद्र तरे यांनीही कार्यालयात प्रवेश करून दमदाटी व शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. तसेच प्रमोद तरे हे दूरध्वनीवरून इतरांना गोंधळ घालण्यास आणि खोटी तक्रार दाखल करण्यास चिथावणी देत असल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
घटनेचे सीसीटीव्ही चित्रीकरण उपलब्ध असून संबंधित पुरावे पोलिसांकडे सादर करण्यात येणार असल्याची माहिती कंपनीच्या सूत्रांनी दिली. या प्रकरणी वरुणा प्रमोद तरे, रंजना तरे, सरिता पाटील, प्रमोद रघुनाथ तरे आणि राजेंद्र तरे यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता (बी एन एस) 2023 कायद्याअंतर्गत कलम 329, 351(2), 131, 127(2), 352, 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
नागोठणे पोलीस पुढील तपास करीत आहेत.
कंपनी अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, कार्यालयीन कामकाजात अडथळा निर्माण करणे, अधिकाऱ्यांना धमकावणे आणि खोट्या आरोपांची भीती दाखवणे हा गंभीर प्रकार असून याबाबत कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे.
दरम्यान, याच प्रकरणात दुसऱ्या पक्षाकडूनही नागोठणे पोलीस ठाण्यात रमेश धनावडे यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांकडून दोन्ही तक्रारींची स्वतंत्रपणे चौकशी सुरू असून सत्य परिस्थिती तपासाअंती स्पष्ट होणार आहे.
….




