ताज्या बातम्यादेश विदेशमहाराष्ट्रमुंबईरायगड

‘जिजा’ची झेप जगभराकडे; अलिबागच्या स्नेहल म्हात्रेंना महाराष्ट्र उद्योगरत्न पुरस्कार


सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम 

अलिबाग |

येथील स्नेहल मिलिंद म्हात्रे यांनी जिद्द, मेहनत आणि मराठी संस्कृतीवरील प्रेमाच्या जोरावर उभारलेल्या “जिजा ज्वेलरी कलेक्शन” या ब्रँडला “महाराष्ट्र उद्योगरत्न पुरस्कार २०२६” अंतर्गत “बेस्ट ट्रेडिशनल ज्वेलरी ब्रँड ऑफ द इयर” हा मानाचा पुरस्कार मिळाला आहे. अभिनेत्री तेजस्विनी पंडित यांच्या हस्ते ३० मे रोजी नाशिक येथील रेडिसन हॉटेलमध्ये हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
स्नेहल म्हात्रे या मूळच्या आयटी इंजिनिअर आणि प्राध्यापक आहेत. २०२० मध्ये मुलाच्या संगोपनासाठी त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला. मात्र, त्याच काळात स्वतःच्या आवडीला व्यवसायाचे रूप देण्याचा निर्धार त्यांनी केला.
मराठी संस्कृती आणि पारंपरिक दागिन्यांबद्दल असलेल्या ओढीतून त्यांनी हँडमेड ज्वेलरीचे प्रशिक्षण घेतले. नथ, बुगडी, कुडी, झुबे, तन्मणी, कोल्हापुरी साज, जोंधळेमणी, बाजूबंद, डोरलं, मंगळसूत्र, चिंचपेटी, चोकर, साडी पिन, खोपा आणि बांगड्यांसारखे असंख्य पारंपरिक दागिने आधुनिक शैलीत साकारत “जिजा ज्वेलरी कलेक्शन”ची स्थापना केली.
घरातून सुरू झालेला हा व्यवसाय आज मोठ्या उंचीवर पोहोचला आहे. २०२३ मध्ये गंधर्व प्रदर्शन आणि पलावा कार्निव्हलमधून सुरू झालेला प्रवास आज “मोरया”, “घे भरारी”, “कसबा” आणि “कस्तुरी” यांसारख्या नामांकित प्रदर्शनांपर्यंत पोहोचला आहे. विशेषतः “मोरया” प्रदर्शन आणि सुनीता यांच्या मार्गदर्शनामुळे “जिजा”ला मोठी ओळख मिळाली.
आज “जिजा”चा स्वतःचा पारंपरिक मराठमोळा स्टुडिओ असून अनेक महाराष्ट्रीयन नववधू आवर्जून “जिजा”चे दागिने परिधान करतात. महाराष्ट्राबरोबरच कर्नाटकपर्यंत घाऊक विक्रीद्वारे या दागिन्यांची पोहोच वाढली आहे. यूट्यूबवरील व्हिडिओंमुळे दुबई आणि अमेरिकेतूनही ऑर्डर्स मिळू लागल्या असून “जिजा”ची ओळख आता जागतिक स्तरावर पोहोचत आहे.
व्यवसायाबरोबरच गरजू महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत त्यांना आत्मविश्वास देण्याचे कामही “जिजा”कडून केले जात आहे. त्यामुळे हा ब्रँड केवळ व्यावसायिक यशाचे नव्हे, तर सामाजिक बांधिलकीचेही उदाहरण ठरत आहे.
स्नेहल म्हात्रे यांच्या या यशामागे पतीचा खंबीर पाठिंबा, मुलाची साथ, आई-वडिलांचे सहकार्य, कुटुंबीयांची मदत आणि मार्गदर्शकांचे प्रोत्साहन असल्याचे त्या आवर्जून सांगतात.
आजही त्यांचे एक मोठे स्वप्न आहे “जिजा”ला जागतिक स्तरावर विशेष ओळख मिळवून देणे आणि मराठी संस्कृतीचा वारसा प्रत्येक घरापर्यंत पोहोचवणे.
……

Related Articles

Back to top button