जेएसडब्ल्यूच्या राखीव वन जमिनीवरील अनधिकृत बांधकामांची जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार पाहणी

सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
अलिबाग : तालुक्यातील मौजे जुई बापूजी येथील सरकारी स.नं. 50/ड या राखीव वन जमिनीवर जेएसडब्ल्यू कंपनीच्या अनधिकृत बांधकामांबाबत तक्रारदार संजय गंगाराम सावंत यांनी जिल्हाधिकारी रायगड यांच्याकडे तक्रार केली. तक्रारीनंतर जिल्हाधिकारी कार्यालयाने संबंधित शासकीय अधिकारीांना आदेश दिले आहेत की, संजय सावंत यांच्या उपस्थितीत स्थळ पाहणी करून सर्व अहवाल सहाय्यक वनसंरक्षक, कांदळवन विभाग, दक्षिण कोकण, अलिबाग यांच्याकडे सादर करावा.
उप वनसंरक्षक अलिबाग यांनी 13 नोव्हेंबर 2019 रोजी दिलेल्या अहवालानुसार, जेएसडब्ल्यू कंपनीने 2009 पासून कांदळवनांचा नाश करून जमिनीवर मातीचा भराव, संरक्षक भिंत बांधणे आणि कनव्हेअर बेल्टसाठी सिमेंट काँक्रिटचे फाउंडेशन बांधणे या वनेत्तर कामांमुळे सरकारी राखीव वन जमीन अतिक्रमित केली आहे. मातीचा भराव 28 जानेवारी 2010 पूर्वी, संरक्षक भिंत 6 नोव्हेंबर 2011 रोजी आणि कनव्हेअर बेल्टचे काम 1 ऑक्टोबर 2017 ते 4 एप्रिल 2018 दरम्यान पूर्ण झाले होते.
सर्वोच्च न्यायालयाने राखीव वनीकरणासाठी आरक्षित जमिनीवरील अशा अतिक्रमणांविषयी महत्त्वपूर्ण निर्देश दिले आहेत. न्यायालयाने राज्य व केंद्रशासित प्रदेशांना आदेश दिला आहे की, या प्रकारच्या जमिनी ताब्यात घेण्यासाठी विशेष तपास पथक स्थापन करावे, वनविभागाकडे सुपूर्द कराव्यात आणि आवश्यक असल्यास जमिनीची किंमत संबंधित व्यक्ती अथवा संस्थेकडून वसूल करून वन विकासासाठी वापरावी.
संजय सावंत यांनी याबाबत मागणी केली आहे की, अलिबाग तालुक्यातील मौजे जुई बापूजी येथील सरकारी राखीव वन व कांदळवनयुक्त जमिनीवरील जेएसडब्ल्यूच्या अतिक्रमणाची तातडीने पाहणी करून वनेत्तर कामे दूर करण्यासाठी वनविभागाने त्वरीत कार्यवाही करावी.




