ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगड

कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या मागण्यांवर जिल्हाधिकारी सकारात्मक; प्रशासकीय प्रश्नांवर तातडीने कार्यवाहीचे आश्वासन


सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम 

अलिबाग |

कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या विविध प्रशासकीय अडचणी, तक्रारी आणि प्रलंबित प्रश्नांबाबत रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांच्यासह जिल्ह्यातील विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
बैठकीदरम्यान कर्मचाऱ्यांच्या विविध समस्या आणि मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी सर्व प्रश्न गांभीर्याने ऐकून घेत काही तातडीच्या प्रकरणांमध्ये संबंधित अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून तत्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.
यावेळी सरळ सेवा भरतीतील अनुशेष भरणे, अनुकंपा भरती प्रक्रियेला गती देणे, निलंबन व पेन्शन प्रकरणे निकाली काढणे, आश्वासित प्रगती योजना, अधिसंख्यपदाची सद्यस्थिती तसेच प्रलंबित वैद्यकीय बिले मंजूर करण्याबाबत चर्चा करण्यात आली.
तसेच ३ डिसेंबर १९८० च्या शासन निर्णयानुसार मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना महत्त्वाच्या पदांवर संधी उपलब्ध करून देणे, त्यांचे गोपनीय अहवाल वेळेत सादर करणे, तीन वर्षे पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांच्या संकलन बदल्या करणे आणि पुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांना महसूल विभागात काम करताना येणाऱ्या अडचणी दूर करण्याची मागणी करण्यात आली.
याशिवाय दुर्गम भागातील आदिवासी विद्यार्थ्यांना विविध दाखले व ओळखपत्रे मिळवून देण्यासाठी विशेष उपक्रम राबविण्याबाबतही चर्चा झाली.
बैठकीत जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी “कर्मचाऱ्यांचे कोणतेही प्रश्न प्रलंबित राहणार नाहीत. प्रशासकीय स्तरावर सर्व प्रकरणांवर सकारात्मक आणि गतीने निर्णय घेतले जातील,” असे आश्वासन दिले.
बैठकीस कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे महासचिव सुरेश तांबे, वरिष्ठ उपाध्यक्ष सुमित भुईगळ, कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष राजेश सदावर्ते, रायगड जिल्हाध्यक्ष संजीव मोरे, महसूल संघटनेचे जिल्हाध्यक्ष राहुल सुर्यवंशी, दिव्यांग विभागाचे सचिव शिवाजी बिवराळे, जिल्हा परिषद रायगडचे जिल्हाध्यक्ष खंडू बागुल, कार्याध्यक्ष सचिन ओव्हाळ, कोषाध्यक्ष विकास बडे, चिटणीस संतोष साळगावकर, उपाध्यक्ष राजेंद्र गायकवाड यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.
बैठकीच्या शेवटी कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे रायगड जिल्हाध्यक्ष संजीव मोरे यांनी प्रशासनातील अधिकारी व उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार मानले.


Related Articles

Back to top button