ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगड

एका घरात किती पदे ! म्हणत वैकुंठ पाटील यांचा राजकीय गेम; ठाकूर-बालदींच्या खेळीने  रातोरात बदलली समीकरणे?


सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम 
अलिबाग  | 
रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावरून भाजपमध्ये जोरदार राजकीय कुरघोडी झाल्याची चर्चा जिल्ह्यात रंगली आहे. पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर आणि उरणचे आमदार महेश बालदी यांनी राजकीय डावपेच आखत पेणचे नवनिर्वाचित सदस्य वैकुंठ पाटील यांचा अध्यक्षपदाचा पत्ता कट केल्याचे बोलले जात आहे.
सुरुवातीपासूनच रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी वैकुंठ पाटील यांचे नाव जवळपास निश्चित मानले जात होते. मात्र शेवटच्या टप्प्यात अचानक समीकरणे बदलली आणि अध्यक्षपदासाठी मंगेश वाकडीकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती राजकीय वर्तुळातून समोर येत आहे.
वैकुंठ पाटील यांच्या नावाला विरोध करताना “एका कुटुंबात किती पदे द्यायची?” हा मुद्दा ठासून पुढे करण्यात आल्याचे सांगितले जाते. वैकुंठ पाटील यांचे वडील रवींद्र पाटील हे पेण विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत, तर त्यांच्या वहिणी प्रीतम पाटील या पेण नगरपालिकेच्या नगराध्यक्ष आहेत. त्यामुळे आणखी एक महत्त्वाचे पद त्याच घरात देणे योग्य ठरणार नाही, असा मुद्दा पक्षश्रेष्ठींसमोर मांडण्यात आल्याची चर्चा आहे.
हा मुद्दा प्रभावीपणे पुढे करत वैकुंठ पाटील यांच्या नावाला विरोध उभा करण्यात यश आल्याचे सांगितले जाते. त्यामुळे ११ तारखेला रातोरात समीकरणे बदलली आणि जवळपास निश्चित मानले जाणारे वैकुंठ पाटील यांचे नाव बाजूला पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
या सर्व घडामोडींमध्ये भाजपचे राजकीय धुरंधर मानले जाणारे सतीश धारप यांनाही अप्रत्यक्ष राजकीय संदेश देण्यात आल्याचे बोलले जात आहे. तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाला सोबत घेण्याचे वरिष्ठ पातळीवरून आदेश देण्यात आल्याने खासदार सुनील तटकरे यांना देखील हा जोरदार धक्का असल्याचे बोलले जाते. या प्रकरणामुळे रायगड जिल्ह्यात भाजपमध्ये दोन गट निर्माण झाल्याचे चित्र स्पष्ट दिसत असून, अध्यक्षपदाच्या निवडीमुळे पक्षातील अंतर्गत राजकारण पुन्हा एकदा उघड्यावर आल्याची चर्चा आहे.
दरम्यान, बुधवारी रात्री हॉटेल रविकिरण आणि हॉटेल ताज या ठिकाणी राजकीय रणनीतीची खलबत्ते सुरू होती. मात्र तटकरे आणि धारप यांची खेळी अयशस्वी झाल्याचे त्या निमित्ताने दिसून येते.

Related Articles

Back to top button