सोनम वांगचुक यांना पोलिसांनी उपोषणस्थळावरून हटवले; अभिजीत दिपके बेमुदत उपोषणावर, संजय राऊतांचा ‘दडपशाही’चा आरोप

सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
नवी दिल्ली |
नीट (NEET) 2026 परीक्षेतील कथित पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या उपोषणादरम्यान शनिवारी सकाळी सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी उपोषणस्थळावरून हटवून रुग्णालयात दाखल केले. या कारवाईनंतर आंदोलनकर्ते आणि दिल्ली पोलिसांनी परस्परविरोधी दावे केले असून, या घटनेवरून राजकीय वातावरणही तापले आहे.
सोनम वांगचुक यांनी 28 जूनपासून जंतर-मंतर येथे उपोषण सुरू केले होते. नीट 2026 परीक्षेतील कथित गैरव्यवहाराची सखोल चौकशी करावी, विद्यार्थ्यांना न्याय मिळावा आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू होते.
शनिवारी सकाळी मोठ्या पोलीस बंदोबस्तात वांगचुक यांना उपोषणस्थळावरून हटविण्यात आले. कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी आरोप केला की, पोलिसांनी वांगचुक यांच्याशी अयोग्य वर्तन केले, शिवीगाळ केली आणि जबरदस्तीने त्यांना ताब्यात घेऊन रुग्णालयात हलवले. दुसरीकडे, दिल्ली पोलिसांनी हे आरोप फेटाळून लावत दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्देशांचा तसेच वांगचुक यांच्या खालावलेल्या प्रकृतीचा विचार करून त्यांना वैद्यकीय उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचा दावा केला आहे.
दरम्यान, शुक्रवारी रात्री प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओ संदेशात सोनम वांगचुक यांनी 20 जुलै रोजी ‘चलो संसद’ आंदोलनाचे आवाहन केले होते. देशभरातील विद्यार्थी, पालक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करत त्यांनी, “देशात कांद्याच्या किंमतींसाठी सरकारला जबाबदार धरले जाते, मग लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित शिक्षण व्यवस्थेतील गैरव्यवहारासाठी सरकारला जबाबदार का धरले जाऊ नये?” असा सवाल उपस्थित केला होता. नीट पेपरफुटी प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली होती.
सोनम वांगचुक यांना रुग्णालयात हलविल्यानंतर आंदोलनाला नवे वळण मिळाले आहे. कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी या कारवाईचा निषेध करत स्वतः बेमुदत उपोषण सुरू करण्याची घोषणा केली आहे. विद्यार्थ्यांना न्याय मिळेपर्यंत आणि आंदोलनाच्या प्रमुख मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण सुरूच राहील, अशी भूमिका त्यांनी जाहीर केली.
या कारवाईवर राजकीय प्रतिक्रियाही उमटू लागल्या आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर टीका करत, देशात दडपशाही सुरू असून लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप केला. सरकारने आंदोलनकर्त्यांशी संवाद साधून हा प्रश्न सोडवावा, अशी मागणीही त्यांनी केली. उद्धव ठाकरे यांचे नागपूर येथे आंदोलन होत आहे. त्या आंदोलनावरून माध्यमांचे लक्ष विचलित करण्यासाठी सोनं वांगचुक यांच्यावर कारवाई केल्याचा आरोप राऊत यांनी केला.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणामुळे नीट परीक्षेतील कथित गैरव्यवहार, विद्यार्थ्यांचे प्रश्न आणि आंदोलनकर्त्यांवरील कारवाई हे मुद्दे पुन्हा एकदा राष्ट्रीय चर्चेच्या केंद्रस्थानी आले असून, पुढील घडामोडींकडे देशभरातील विद्यार्थी, पालक आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे.
……


