क्रीडाताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगड

रायगडच्या क्रिकेटला नवी भरारी; एमसीएच्या निवड चाचणी शिबिरासाठी कौस्तुभ, अमेय आणि रोशनीची निवड

पुण्यातील शिबिरात महाराष्ट्राच्या मुख्य संघात स्थान मिळविण्यासाठी रंगणार कसोटी; रायगडच्या क्रिकेट विश्वात आनंदाचे वातावरण


सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम

अलिबाग |

रायगड जिल्ह्यातील क्रिकेट प्रतिभेला पुन्हा एकदा मोठी दाद मिळाली असून महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (एमसीए) आयोजित निवड चाचणी शिबिरासाठी रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या तीन गुणवान खेळाडूंची निवड झाली आहे. कौस्तुभ म्हात्रे (पेण) याची २३ वर्षांखालील मुलांच्या गटासाठी, अमेय पाटील (उरण) याची १९ वर्षांखालील मुलांच्या गटासाठी, तर कुमारी रोशनी पारधी (महाड) हिची महाराष्ट्राच्या वरिष्ठ महिला संघाच्या निवड चाचणी शिबिरासाठी निवड करण्यात आली आहे.
या तिन्ही खेळाडूंनी विविध स्पर्धांमध्ये सातत्यपूर्ण आणि प्रभावी कामगिरी करत आपल्या गुणवत्तेची छाप उमटवली. त्याच कामगिरीच्या बळावर त्यांना एमसीएच्या प्रतिष्ठित निवड चाचणी शिबिरात स्थान मिळाले आहे. पुणे येथे होणाऱ्या या शिबिरात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना महाराष्ट्राच्या मुख्य संघात प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे.
रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील, सचिव प्रदीप नाईक यांच्यासह सर्व पदाधिकारी, सदस्य आणि क्रिकेटप्रेमींनी तिन्ही खेळाडूंचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. महाराष्ट्राच्या संघात स्थान मिळवून रायगड जिल्ह्याचे नाव राज्याच्या क्रिकेट विश्वात अधिक उंचावावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
गेल्या काही वर्षांत रायगडमधील अनेक खेळाडूंना महाराष्ट्राच्या विविध वयोगटांतील संघांमध्ये संधी मिळत असल्याने जिल्ह्यातील क्रिकेटची गुणवत्ता सातत्याने उंचावत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे नवोदित खेळाडूंमध्येही नव्या उत्साहाची आणि मोठी स्वप्ने पाहण्याची प्रेरणा निर्माण झाली असून, रायगड क्रिकेटसाठी ही अभिमानाची आणि आशादायी घडामोड मानली जात आहे.


Related Articles

Back to top button