ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगड

‘विकासापलीकडे समाजकारण’; रक्तदान शिबिरात अक्षया नाईक-प्रशांत नाईक यांनी जपली सामाजिक बांधिलकी

माजी आमदार मधुशेठ ठाकूर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित उपक्रमाला भेट; समाजहिताच्या प्रत्येक चळवळीत सहभागाची भूमिका


सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम

अलिबाग |

विकासकामांबरोबरच समाजोपयोगी उपक्रमांमध्ये सातत्याने सहभाग नोंदवत लोकांशी नाळ जोडणारे नेतृत्व म्हणून अलिबागच्या नगराध्यक्षा अक्षया नाईक, माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान वीज व बांधकाम समितीचे सभापती प्रशांत नाईक आणि उपनगराध्यक्षा ऍडव्होकेट मानसी म्हात्रे यांनी पुन्हा एकदा आपल्या सामाजिक बांधिलकीचा प्रत्यय दिला. काँग्रेसचे माजी आमदार स्वर्गीय मधुशेठ ठाकूर यांच्या ७९ व्या जयंतीनिमित्त आणि पाचव्या स्मृतिदिनानिमित्त अलिबाग सातीर्जे येथे आयोजित रक्तदान शिबिराला त्यांनी भेट देत समाजहिताच्या उपक्रमांना कायम पाठबळ देण्याची भूमिका अधोरेखित केली.

स्वर्गीय मधुशेठ ठाकूर सामाजिक संस्था, अलिबाग आणि जिल्हा रुग्णालय शासकीय रक्त केंद्र, अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या रक्तदान शिबिरात नगराध्यक्षा अक्षया नाईक आणि प्रशांत नाईक यांनी स्वर्गीय मधुशेठ ठाकूर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यानंतर त्यांनी रक्तदाते, आयोजक आणि स्वयंसेवकांशी संवाद साधत रक्तदानासारख्या जीवनदायी उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले.

यावेळी नगराध्यक्षा अक्षया नाईक यांनी समाजहिताचे उपक्रम हे कोणत्याही एका संस्था किंवा व्यक्तीपुरते मर्यादित नसून संपूर्ण समाजाच्या सहभागातूनच यशस्वी होतात, असे सांगत रक्तदानासारख्या उपक्रमांमध्ये युवकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले.

सभापती प्रशांत नाईक यांनी स्वर्गीय मधुशेठ ठाकूर यांनी समाजकारणातून निर्माण केलेला लोकसंपर्क आणि सेवाभाव हा पुढील पिढीसाठी प्रेरणादायी असल्याचे नमूद करत, अशा विधायक उपक्रमांना नगरपरिषदेचे सहकार्य भविष्यातही कायम राहील, अशी भूमिका व्यक्त केली.

या रक्तदान शिबिरात रवी थोरात, कपिल अनुभवणे यांच्यासह अनेक रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून समाजाप्रती आपली जबाबदारी पार पाडली. रक्तदानामुळे अनेक गरजू रुग्णांना जीवनदान मिळू शकते, हा संदेश या उपक्रमातून प्रभावीपणे देण्यात आला.

याप्रसंगी नगरसेविका अश्विनी ठोसर, नगरसेविका निवेदिता वाघमारे, नगरसेवक ॲड. ऋषिकेश माळी, नगरसेवक समीर ठाकूर, काँग्रेसचे नेते रविंद्र ठाकूर (काका), राजेंद्र ठाकूर, रविंद्र ठाकूर (नाना), ॲड. प्रवीण ठाकूर तसेच इतर पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सामाजिक प्रश्नांमध्ये सक्रिय सहभाग, विकासकामांबरोबरच लोकाभिमुख उपक्रमांना सातत्याने दिलेले पाठबळ आणि समाजहिताच्या प्रत्येक विधायक उपक्रमात उपस्थिती, या माध्यमातून नगराध्यक्षा अक्षया नाईक आणि सभापती प्रशांत नाईक यांनी ‘सेवेचे समाजकारण’ ही संकल्पना प्रत्यक्ष कृतीतून अधोरेखित केल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
…….


Related Articles

Back to top button