ताज्या बातम्यादेश विदेशमहाराष्ट्रमुंबईरायगड
अपयश विसरा… युवाशक्तीच्या बळावर शेकाप पुन्हा डरकाळी फोडणार; जयंत पाटील यांनी २०२९ साठी फुंकले रणशिंग
संघटनात्मक पुनर्बांधणीची घोषणा; युवकांना नेतृत्वात अग्रस्थान, महाविकास-इंडिया आघाडीच्या माध्यमातून परिवर्तनाचे लक्ष्य; स्मार्ट मीटर आणि तिसऱ्या महामुंबईविरोधात तीव्र जनआंदोलनाचा इशारा

सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
खालापूर |
“अपयश हा शेवट नसतो, तर नव्या संघर्षाची सुरुवात असते. आज देशातील युवाशक्ती परिवर्तनासाठी रस्त्यावर उतरली आहे आणि त्याची प्रचिती दिल्लीच्या जंतरमंतरवर संपूर्ण देशाने पाहिली. शांततामय आंदोलनाच्या जोरावर मोदी सरकारच्या मंत्र्याला राजीनामा द्यायला भाग पाडणारी ताकद जर देशातील युवकांमध्ये असेल, तर महाराष्ट्रात शेतकरी कामगार पक्षाच्या पुनरागमनाची मशालही हाच युवक पेटवणार आहे, असे प्रतिपादन शेकापचे सरचिटणीस माजी आमदार जयंत पाटील यांनी केले.
आता निराशेचा नाही, तर नव्या संघर्षाचा काळ सुरू झाला आहे. युवकांच्या बळावर शेतकरी कामगार पक्ष पुन्हा महाराष्ट्राच्या राजकारणात डरकाळी फोडेल आणि २०२९ च्या परिवर्तनाच्या लढ्यात निर्णायक शक्ती म्हणून उभा राहील,” अशी आक्रमक घोषणा माजी आमदार जयंत पाटील यांनी केली.
याप्रसंगी युवा नेत्या ऍडव्होकेट सोम्या कोरडे हिच्या हस्ते हजारोहण करण्यात आले.
खालापूर येथे पार पडलेल्या शेतकरी कामगार पक्षाच्या ७९ व्या वर्धापन दिन सोहळ्यात जयंत पाटील यांनी पक्षाच्या आगामी राजकीय वाटचालीचा स्पष्ट आराखडा जाहीर करत, ही केवळ वर्धापन दिनाची सभा नसून शेकापच्या राजकीय पुनरागमनाची रणघोषणा असल्याचे स्पष्ट केले. आगामी काळात पक्षाची संघटनात्मक पुनर्बांधणी युद्धपातळीवर राबविली जाईल, युवकांना नेतृत्वाच्या केंद्रस्थानी आणले जाईल आणि जनतेच्या प्रत्येक प्रश्नावर संघर्ष अधिक तीव्र केला जाईल, असा संदेश त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.

“आम्ही पराभवातून पळणारे नाही, तर पराभवाचे रूपांतर नव्या विजयात करणारे कार्यकर्ते आहोत,” असे सांगत जयंत पाटील म्हणाले की, शेकापची खरी ताकद निवडणुकीतील जागांमध्ये नसून जनतेच्या विश्वासात आणि संघर्षाच्या परंपरेत आहे. पुढील काळात प्रत्येक गावात, प्रत्येक शहरात संघटना उभी केली जाईल. युवकांच्या खांद्यावर जबाबदारी सोपवून पक्षाला नवसंजीवनी दिली जाईल. येणाऱ्या काळात महाराष्ट्राच्या राजकारणात शेतकरी कामगार पक्षाची दखल घेतल्याशिवाय कोणतेही राजकारण पूर्ण होणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

देशाच्या राजकारणावर भाष्य करताना त्यांनी सांगितले की, संविधानाच्या चौकटीत राहून लोकशाही वाचविण्याचा लढा देणाऱ्या राहुल गांधी यांच्या विचारांभोवती आज देशातील युवक एकवटत आहे. त्यामुळे राज्यात महाविकास आघाडी आणि देशात इंडिया आघाडीच्या माध्यमातून २०२९ मध्ये परिवर्तन घडविण्याचा निर्धार करून प्रत्येक कार्यकर्त्याने आतापासून जनतेमध्ये उतरावे, असे आवाहन त्यांनी केले.
तिसऱ्या महामुंबई प्रकल्पावर घणाघाती हल्ला चढवत जयंत पाटील म्हणाले की, विकासाच्या नावाखाली पेण, अलिबाग आणि रोहा परिसरातील भूमिपुत्रांना त्यांच्या मातीतून हद्दपार करण्याचा कोणताही डाव शेतकरी कामगार पक्ष हाणून पाडेल. स्थानिकांच्या जमिनी, रोजगार आणि अस्तित्वावर घाला घालणाऱ्या प्रत्येक निर्णयाविरोधात रस्त्यावर उतरून संघर्ष केला जाईल. भूमिपुत्रांच्या हक्कांशी तडजोड करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असा स्पष्ट इशारा त्यांनी सरकारला दिला.

स्मार्ट मीटर योजनेवरही त्यांनी सरकारला थेट आव्हान दिले. “जनतेवर लादलेली स्मार्ट मीटरची सक्ती आम्ही कोणत्याही परिस्थितीत सहन करणार नाही. वीज ग्राहकांची आर्थिक लूट थांबविण्यासाठी शेतकरी कामगार पक्ष रस्त्यावर उतरून स्मार्ट मीटरची होळी करेल आणि लाखोंच्या संख्येने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत सरकारला हा निर्णय मागे घ्यायला भाग पाडले,” असा इशारा त्यांनी दिला.
भाषणाच्या शेवटी जयंत पाटील यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “८० व्या वर्षात प्रवेश करणारा शेतकरी कामगार पक्ष हा केवळ इतिहास सांगणारा पक्ष राहणार नाही, तर महाराष्ट्राच्या राजकारणात नवा इतिहास घडविणारा पक्ष ठरेल. युवकांच्या हातात झेंडा, जनतेच्या मनात विश्वास आणि संघर्षाच्या बळावर शेकापुन्हा उभा राहील. २०२९ च्या परिवर्तनाच्या लढाईत शेतकरी कामगार पक्ष अग्रभागी असेल.”

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा आणि लोकसभा अशा सर्व निवडणुका काँग्रेस आणि शेतकरी कामगार पक्ष खांद्याला खांदा लावून लढतील, अशी स्पष्ट घोषणा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. राज्यात सध्या सत्ताधारी पक्षांकडून मतदारांना पैशांचे आमिष दाखवून, आमदार-खासदार फोडाफोडीचे राजकारण केले जात आहे. लोकशाहीची पायमल्ली सुरू असल्याचा गंभीर आरोप त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही त्यांनी अत्यंत जहरी शब्दांत टीका करत, “ते नरेंद्र नाहीत, तर दलिंदर पेक्षाही ‘ एपस्टीन फाइल्स’मधील बिलंदर आहेत,” असा घणाघात केला.
राजकारणातील वाढत्या पक्षांतराच्या प्रवृत्तीवर हल्लाबोल करताना सपकाळ म्हणाले, “आज अनेकांची निष्ठा विचारांशी नसून सत्तेशी जोडली गेली आहे. सत्ता दिसली की पक्ष बदलण्याची स्पर्धा लागली आहे. पण पक्षाचा मोठेपणा आमदार-खासदारांच्या संख्येवर ठरत नाही; तो जनतेच्या मनातील विश्वासावर आणि मातीत किती खोलवर रुजला आहे यावर ठरतो.” शेतकरी कामगार पक्षाकडे पाहिल्यावर संघर्ष, विचारनिष्ठा आणि जनाधाराची ही ताकद स्पष्ट दिसते, असे सांगत त्यांनी ८० व्या वर्षात पदार्पण करणारा शेकाप हा केवळ एक राजकीय पक्ष नसून महाराष्ट्राच्या पुरोगामी आणि संघर्षशील राजकारणाचा जिवंत इतिहास आहे, असे गौरवोद्गार त्यांनी काढले. संघर्षाची ही परंपरा अधिक बळकट व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करत सकपाळ यांनी शेकापच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार रोहित पवार, शेतकरी कामगार पक्षाच्या राज्य प्रवक्त्या चित्रलेखा पाटील, राज्य महिला आघाडीच्या अध्यक्षा ॲड. मानसी म्हात्रे आणि युवा नेत्या एडवोकेट सौम्य कोरडे यांनीही कार्यकर्त्यांना संबोधित करत सत्ताधाऱ्यांविरोधात आक्रमक भूमिका मांडली. तिन्ही नेत्यांनी आपल्या भाषणातून युवकांमध्ये नवचैतन्य, संघर्षाची प्रेरणा आणि परिवर्तनाची ऊर्जा जागविण्याचा प्रयत्न केला. देशाच्या आणि राज्याच्या राजकारणात सत्ताधाऱ्यांचा वाढता माज केवळ युवाशक्तीच उतरवू शकते, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. विचारांची लढाई रस्त्यावर आणि जनतेमध्ये नेण्याचे आवाहन करत, आगामी काळात युवकांनीच परिवर्तनाचे नेतृत्व स्वीकारावे, असे आवाहन त्यांनी केले. शेकापच्या ८० व्या वर्षात प्रवेशाचा हा केवळ वर्धापन सोहळा नसून संघर्षाच्या नव्या पर्वाची सुरुवात असल्याचे सांगत त्यांनी कार्यकर्त्यांना अधिक जोमाने मैदानात उतरण्याचे आवाहन केले. याप्रसंगी जिल्हा चिटणीस सुरेश खैरे यांनी पक्षाचे अहवाल वाचन केले.

…..




