नारळी पौर्णिमेनिमित्त अलिबाग कोळीवाड्यात जल्लोष; प्रशांत नाईक यांच्या उपस्थितीत समुद्राला सोन्याचा नारळ अर्पण

सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
अलिबाग |
कोळी बांधवांच्या पारंपरिक आणि श्रद्धेचा सण असलेल्या नारळी पौर्णिमेनिमित्त अलिबाग कोळीवाड्यात यंदाही मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली. अलिबाग नगर परिषदेचे वीज व बांधकाम सभापती प्रशांत नाईक यांच्या उपस्थितीत झालेल्या या सोहळ्यात कोळी समाजाने पारंपरिक पद्धतीने समुद्रदेवतेचे पूजन करून सोन्याचा नारळ समुद्राला अर्पण केला.
कोळी समाजाची उपजीविका प्रामुख्याने समुद्र आणि मासेमारीवर अवलंबून आहे. पावसाळ्यात समुद्र खवळलेला असल्याने नारळी पौर्णिमेच्या दिवशी समुद्र शांत व्हावा, मासेमारीचा हंगाम सुखरूप सुरू व्हावा आणि कोळी बांधवांचे जीवन सुरक्षित राहावे, या श्रद्धेतून समुद्राला नारळ अर्पण करण्याची परंपरा आहे.
अलिबाग कोळीवाड्यातील श्री खंडोबा मंदिरापासून सोन्याचा नारळ रथात विराजमान करून भव्य मिरवणुकीला सुरुवात झाली. पारंपरिक वेशभूषेत महिला, पुरुष तसेच लहान मुले मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ढोल-ताशांचा गजर आणि बँडच्या तालावर संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. पारंपरिक संस्कृती आणि धार्मिक श्रद्धेचे दर्शन घडविणाऱ्या या मिरवणुकीत कोळी बांधवांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.
मिरवणूक समुद्रकिनारी पोहोचल्यानंतर सायंकाळी विधिवत पूजा करण्यात आली. नारळ आणि समुद्रदेवतेचे पूजन करून समुद्राला सोन्याचा नारळ अर्पण करण्यात आला. यानंतर कोळी बांधवांनी नव्या मासेमारी हंगामासाठी समुद्रदेवतेकडे सुख-समृद्धी, सुरक्षितता आणि भरभराटीची प्रार्थना केली.

या पारंपरिक सोहळ्यात प्रशांत नाईक यांनी कोळी बांधवांसोबत सहभागी होत त्यांच्या श्रद्धा आणि परंपरेचा सन्मान केला. स्थानिकांच्या धार्मिक व सांस्कृतिक परंपरांना जपण्यासोबतच कोळी समाजाच्या प्रश्नांसाठी आणि विकासासाठी आपण सदैव त्यांच्या पाठीशी राहू, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
याप्रसंगी विजय भगत, चिंतामण भगत, अनिरुद्ध भगत, नगरसेवक सागर भगत, एडवोकेट ऋषिकेश माळी, अनिल चोपडा, एडवोकेट प्रवीण ठाकूर, एडवोकेट अंकित बंगेरा यांच्यासह कोळी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. पारंपरिक श्रद्धा, संस्कृती आणि उत्साहाच्या संगमातून अलिबाग कोळीवाड्यातील नारळी पौर्णिमेचा सोहळा मोठ्या जल्लोषात पार पडला.




