विचारधारा संपली; आता पक्ष नाहीत, तर नेत्यांच्या खासगी राजकीय कंपन्या उरल्यात, राजकीय पक्षांमध्ये सुरू आहे व्यक्तिपूजेची धोकादायक संस्कृती

फडशा विशेष
सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
आविष्कार देसाई
अलिबाग |
एकेकाळी पक्षांमध्ये कार्यकर्ता हा खरा केंद्रबिंदू मानला जायचा आणि नेते स्वतः कार्यकर्त्यांच्या नाराजीला घाबरत असायचे. कारण कार्यकर्ताच पक्ष उभा करायचा, संघर्ष करायचा आणि जनतेशी थेट नाळ जोडून ठेवायचा. पण आजचे चित्र पूर्णपणे उलटे झाले आहे. आता नेते प्रचंड मोठे झाले आहेत आणि कार्यकर्ता केवळ त्यांच्या भोवती फिरणारा उपयोगी घटक बनला आहे. पूर्वी नेत्यांकडून कार्यकर्त्याचा सन्मान केला जायचा; आज मात्र एखादा ठेका, शिफारस, छोटे काम किंवा स्थानिक लाभ कार्यकर्त्याच्या अंगावर फेकून त्याच्याकडून आयुष्यभर राजकीय मजुरी करून घेण्याची नवी व्यवस्था तयार झाली आहे. यात कार्यकर्ता देखील स्वतःचा स्वार्थ साधत असतो आणि नेता देखील स्वतःचे साम्राज्य मजबूत करत असतो. पण या व्यवहारात विचार, लोकशाही आणि संघटनात्मक मूल्ये पूर्णपणे चिरडली जात आहेत. कारण ज्या दिवशी कार्यकर्ता प्रश्न विचारणे सोडून फक्त आदेश पाळू लागतो, त्या दिवशी लोकशाही संपण्याची प्रक्रिया सुरू होते.
पूर्वी पक्ष मोठा आणि नेता त्यातला एक चेहरा असायचा. आज परिस्थिती उलटी झाली आहे. आता नेता मोठा आणि पक्ष त्याच्या भोवती फिरणारी खासगी यंत्रणा बनत चालल्याचे चित्र दिसते. कार्यकर्त्यांची निष्ठा विचारधारेपेक्षा थेट व्यक्तीकडे वळली आहे. त्यामुळे “पक्षासाठी लढणारा कार्यकर्ता” हळूहळू “नेत्यासाठी भिडणारा समर्थक” बनत चालला आहे.

यातूनच एक गंभीर प्रश्न निर्माण होतो हे कार्यकर्ते खरोखर राजकीय कार्यकर्ते उरले आहेत की ते आता आपल्या सो कॉल्ड नेत्यांच्या राजकीय कंपनीचे मिंधे बनत चालले आहेत? कारण आज अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांचे काम जनतेचे प्रश्न मांडणे, सरकारला जाब विचारणे किंवा संघटना मजबूत करणे हे राहिलेले नाही. त्याऐवजी कोण सोशल मीडियावर नेत्याची स्तुती करतो, कोण विरोधकांवर वैयक्तिक टीका करतो, कोण नेत्याच्या कार्यक्रमासाठी गर्दी जमवतो आणि कोण विरोधकांना धमकावतो यावरच “निष्ठा” मोजली जाते.
विशेष म्हणजे अनेक कार्यकर्तेही हे वास्तव आनंदाने स्वीकारताना दिसतात. कारण विचारधारेवर उभे राहिल्यास संघर्ष करावा लागतो; पण व्यक्तिपूजेतून तात्काळ राजकीय लाभ, पदे, ठेके, शिफारसी आणि स्थानिक प्रभाव मिळण्याची शक्यता असते. त्यामुळे संघटनात्मक राजकारण मागे पडत आहे आणि “नेत्याभोवती फिरणारी टोळी संस्कृती” पुढे येत आहे.
हा बदल केवळ एका पक्षापुरता मर्यादित नाही. जवळपास सर्वच पक्षांमध्ये स्थानिक पातळीवर छोटे-छोटे सत्ता केंद्र तयार झाली आहेत. प्रत्येक गट स्वतःला पक्ष समजू लागला आहे. त्यामुळे पक्षाची अधिकृत भूमिका दुय्यम ठरते आणि “साहेब, शेठ, भाई काय म्हणतात?” हेच अंतिम राजकारण बनते.
यामुळे सर्वात मोठे नुकसान लोकशाहीचे होते. कारण विचारधारा संपली की प्रश्न विचारणारे कार्यकर्ते संपतात. आणि प्रश्न विचारणारे संपले की नेत्यांभोवती फक्त टाळ्या वाजवणारे लोक उरतात. अशा वेळी संघटना हळूहळू लोकशाही मंच न राहता खासगी राजकीय कंपन्यांमध्ये बदलतात.
पूर्वी कार्यकर्ते नेत्याला घडवायचे; आता अनेक ठिकाणी नेते कार्यकर्त्यांचा वापर स्वतःचे साम्राज्य टिकवण्यासाठी करत असल्याचे दिसते. अधिक धोकादायक म्हणजे कार्यकर्तेही त्याला विरोध करण्याऐवजी स्वतःची ओळखच त्या नेत्याशी जोडून घेत आहेत. त्यामुळे नेता पडला तर कार्यकर्त्याचेही राजकारण संपते, अशी मानसिक गुलामी निर्माण होत चालल्याची टीका आता उघडपणे होऊ लागली आहे.
रायगडमधील सध्याच्या संघर्षाकडेही याच नजरेतून पाहण्याची गरज आहे. कारण इथे पक्ष विरुद्ध पक्ष अशी लढाई कमी आणि “कोणत्या नेत्याच्या मागे किती आंधळे समर्थक उभे आहेत?” असे चित्र दिसते. त्यामुळे कार्यकर्त्यांची आक्रमकता ही विचारांसाठी नसून “आपल्या नेत्याच्या वर्चस्वासाठी” अधिक असल्याचे दिसते.
हा ट्रेंड वेळेत थांबला नाही, तर भविष्यात पक्षांमध्ये कार्यकर्ते उरणार नाहीत; फक्त विविध नेत्यांच्या खासगी राजकीय ब्रँडचे प्रचारक उरतील. आणि तेव्हा लोकशाहीत विचारांचा आवाज पूर्णपणे हरवून जाईल.
…..




