स्वच्छतेचे खरे शिल्पकार ठरले सन्मानाचे मानकरी; ‘नमस्ते डे’ निमित्त अलिबाग नगर परिषदेचा अनोखा उपक्रम
नगराध्यक्षा अक्षया नाईक व उपनगराध्यक्ष अॅड. मानसी म्हात्रे यांच्या हस्ते स्वच्छता दूतांसह स्वच्छता अभियानात योगदान देणाऱ्यांचा गौरव

सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
अलिबाग |
“आपले शहर स्वच्छ, सुंदर आणि निरोगी ठेवण्यासाठी स्वच्छता कर्मचारी अहोरात्र परिश्रम घेत असतात. त्यांच्या कार्याचा सन्मान करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. आधुनिक यंत्रसामग्रीच्या वापरातून त्यांना सुरक्षित आणि सन्मान्य कार्यपरिसर उपलब्ध करून देणे, हीच ‘नमस्ते डे’ची खरी भावना आहे,” असे प्रतिपादन उपनगराध्यक्ष अॅड. मानसी म्हात्रे यांनी केले.
नमस्ते डे’च्या निमित्ताने उपनगराध्यक्ष अॅड. मानसी म्हात्रे यांनी स्वच्छता कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करत नागरिकांना स्वच्छता, सुरक्षितता आणि मानवी सन्मानाचा संदेश दिला.
भारत सरकारच्या National Action for Mechanised Sanitation Ecosystem (NAMASTE) ‘नॅशनल ॲक्शन फॉर मेकनाइज्ड सॅनिटेशन इकोसिस्टिम (नमस्ते)’ या उपक्रमांतर्गत १४ जुलै रोजी देशभर ‘नमस्ते डे’ साजरा करण्यात आला. या दिनाचे औचित्य साधत अलिबाग नगर परिषदेतर्फे डॉ. नानासाहेब धर्माधिकारी सभागृहात विशेष सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.

या प्रसंगी नगराध्यक्षा अक्षया नाईक व उपनगराध्यक्ष अॅड. मानसी म्हात्रे यांच्या हस्ते अलिबाग नगर परिषदेतील स्वच्छता कर्मचारी (स्वच्छता दूत) तसेच शहरातील स्वच्छता अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी मोलाचे योगदान देणाऱ्या विविध व्यक्ती, संस्था आणि सहकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.
‘नमस्ते डे’चा उद्देश स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सन्मान करणे, त्यांच्या आरोग्य व सुरक्षिततेला प्राधान्य देणे, धोकादायक हाताने स्वच्छता (Manual Scavenging) पूर्णपणे बंद करून यांत्रिक स्वच्छता व्यवस्थेला प्रोत्साहन देणे हा आहे. या माध्यमातून स्वच्छता कर्मचाऱ्यांना सुरक्षित साधने, आधुनिक यंत्रसामग्री, प्रशिक्षण आणि सन्मानजनक कार्यपरिसर उपलब्ध करून देण्याचा संदेश देण्यात येतो.

कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या निस्वार्थ सेवेला सलाम करत शहराच्या स्वच्छतेमागे त्यांचे योगदान अत्यंत मोलाचे असल्याचे नमूद केले. स्वच्छता ही केवळ नगर परिषदेची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाने ती स्वतःची सामाजिक जबाबदारी समजून शहर स्वच्छ ठेवण्यासाठी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या कार्याचा गौरव, त्यांच्याप्रती कृतज्ञता आणि सुरक्षित, सन्मान्य कार्यसंस्कृतीचा संदेश देणारा हा उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. उपस्थितांनी स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी अलिबाग घडविण्याचा निर्धार व्यक्त करत स्वच्छता दूतांच्या कार्याला मानवंदना दिली.
या कार्यक्रमास नगराध्यक्षा अक्षया नाईक, नगरसेविका संध्या पालवणकर, नगरसेविका अॅड. नीलम हजारे, नगरसेवक अॅड. ऋषिकेश माळी, नगरसेवक जमालुद्दीन सय्यद, नगरसेवक संदीप पालकर, इन्फिनिटी पब्लिक रिलेशन, पनवेलचे अयुफ अकुला, के.एल.ई. महाविद्यालय, पनवेलचे प्रतिनिधी, अलिबाग नगर परिषद उर्दू शाळेचे प्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी श्रीमती प्रियांका वाघ, नगर अभियंता संतोष मुंढे, स्वच्छता अभियंता प्रियांका मोरे, स्वच्छता निरीक्षक धनंजय आंब्रे, शहर समन्वयक आर्या जाधव, प्रकाश तांबे तसेच अलिबाग नगर परिषदेचे सर्व अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
…..
“स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सन्मान म्हणजे त्यांच्या श्रमांचा आणि समाजासाठीच्या योगदानाचा गौरव होय. त्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अलिबाग नगर परिषद कटिबद्ध आहे.” -नगराध्यक्षा अक्षया नाईक, अलिबाग नगरपरिषद




