नवरात्राच्या उत्साहात जनसंवादाचा रंग; प्रशांत नाईक यांची देवीचरणी रायगडच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना
घरत आळी, शास्त्रीनगर येथील देवीच्या आगमन सोहळ्यात सहभाग; बळीराजाच्या भरभराटीसाठीही घातले साकडे

सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
अलिबाग |
नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने अलिबागमध्ये भक्तीचा उत्साह शिगेला पोहोचला असताना, उत्सवाच्या निमित्ताने नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या आनंदात सहभागी होण्याचा वेगळा अनुभव अलिबाग नगर परिषदेचे वीज व बांधकाम सभापती प्रशांत नाईक यांनी घेतला. देवीच्या आगमन सोहळ्यांमध्ये सहभागी होत त्यांनी केवळ धार्मिक विधींमध्ये सहभाग नोंदवला नाही, तर अलिबागसह संपूर्ण रायगडच्या सुख-समृद्धीसाठी देवीचरणी साकडे घातले.
अलिबागमधील घरत आळी येथील देवीच्या आगमन सोहळ्यात प्रशांत नाईक यांनी उपस्थित राहून देवीचे दर्शन घेतले. त्यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली. यावेळी उत्सवासाठी एकत्र आलेल्या नागरिकांशी त्यांनी संवाद साधत नवरात्राच्या शुभेच्छा दिल्या.
यानंतर शास्त्रीनगर येथील पोहरादेवीच्या आगमन सोहळ्यातही प्रशांत नाईक यांनी सहभाग घेतला. देवीच्या आगमनाने परिसरातील उत्साहात आणखी भर पडली. पारंपरिक उत्सवाच्या वातावरणात नागरिकांसोबत सहभागी होत त्यांनी भक्तिभावाने देवीचे दर्शन घेतले.

विशेष म्हणजे, देवीसमोर साकडे घालताना प्रशांत नाईक यांनी केवळ स्वतःसाठी किंवा राजकीय वाटचालीसाठी प्रार्थना न करता अलिबागकरांसह संपूर्ण रायगडच्या सुख-समृद्धीची आणि बळीराजाच्या भरभराटीची प्रार्थना केली. “अलिबागकर आणि संपूर्ण रायगडवासीयांना सुख-समृद्धी लाभू दे. बळीराजाला चांगले दिवस येऊ देत,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

नवरात्रोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता समाजाला एकत्र आणणारा आणि माणसामाणसांतील संवाद वाढवणारा उत्सव आहे. याच भावनेतून प्रशांत नाईक यांनी विविध मंडळांच्या उत्सवांमध्ये सहभागी होत नागरिकांच्या आनंदात सहभाग नोंदवला. त्यामुळे त्यांच्या उपस्थितीला केवळ राजकीय किंवा औपचारिक कार्यक्रमाची छटा न राहता ‘उत्सवाच्या निमित्ताने जनतेच्या सुख-दुःखाशी जोडले जाणे’ असा मानवी स्पर्श मिळाला.
…..




