ताज्या बातम्यादेश विदेशमहाराष्ट्रमुंबईरायगडसंपादकीय

हलवा समारंभ: बजेटमागची गुप्त गोपनीयतेची परंपरा–ब्रिटिश काळापासून आजपर्यंतचा ऐतिहासिक प्रवास  


सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम / डिजिटल डेस्क टीम 

नवी दिल्ली  |

केंद्रीय अर्थसंकल्प सादर होण्याच्या काही दिवस आधी देशाच्या आर्थिक व्यवस्थेच्या केंद्रस्थानी एक अनोखा, गोड आणि गूढ समारंभ पार पडतो. “हलवा समारंभ”. मोठ्या कढईत तयार केलेला हलवा, त्याभोवती उभे असलेले अर्थमंत्री, सचिव आणि कर्मचारी, आणि त्या गोड क्षणानंतर सुरू होणारी कठोर गोपनीयतेची प्रक्रिया  हा सोहळा केवळ गोड पदार्थापुरता मर्यादित नसून, तो भारतीय प्रशासनाच्या इतिहासातील एक प्रतीकात्मक अध्याय आहे.

हलवा समारंभ हा अर्थसंकल्पाच्या छपाई प्रक्रियेचा अधिकृत शुभारंभ मानला जातो. या दिवशी अर्थमंत्री वित्त मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासोबत हलवा ढवळतात आणि तो सर्वांना वाटतात. या गोड वाटपामागे एक गंभीर अर्थ दडलेला असतो, कारण याच क्षणानंतर सुरू होतो तथाकथित “लॉक-इन कालावधी”. या कालावधीत बजेट छपाईशी संबंधित सर्व अधिकारी आणि कर्मचारी बजेट सादर होईपर्यंत बाहेरच्या जगापासून पूर्णपणे वेगळे राहतात. मोबाईल, इंटरनेट आणि कुटुंबीयांशी संपर्कावर निर्बंध ठेवले जातात, जेणेकरून बजेटमधील कोणतीही माहिती बाहेर गळू नये.

इतिहासकार आणि प्रशासकीय नोंदी सांगतात की हलवा समारंभाची परंपरा ब्रिटिश काळात, अंदाजे 1920 ते 1930 च्या दशकात सुरू झाली. त्या काळात बजेट छापण्यासाठी मोठ्या छापखान्यांमध्ये अनेक कर्मचारी काम करायचे. गोपनीयता राखण्यासाठी ब्रिटिश प्रशासनाने “लॉक-इन सिस्टम” लागू केली आणि या कठोर व तणावपूर्ण प्रक्रियेच्या सुरुवातीला कर्मचाऱ्यांचा उत्साह वाढावा तसेच शुभारंभ व्हावा म्हणून गोड पदार्थ देण्याची पद्धत सुरू झाली. याच प्रक्रियेतून हलवा समारंभाची परंपरा जन्माला आली.

ब्रिटिशांना हलवा माहिती होता का, हा प्रश्न अनेकांच्या मनात येतो. याचं थोडक्यात उत्तर म्हणजे हो, ब्रिटिशांना “Halva” किंवा “Halvah” हा गोड पदार्थ माहिती होता. तो फक्त भारतातच नव्हे, तर मध्यपूर्व, मध्य आशिया आणि युरोपातील काही भागांमध्येही ओळखला जातो. मात्र, हलवा हा ब्रिटिश संस्कृतीचा पारंपरिक पदार्थ नव्हता. त्यांच्या गोड पदार्थांमध्ये पुडिंग, पाय आणि केक यांचा समावेश होता. म्हणून इतिहासकारांचं मत असं आहे की ब्रिटिशांनी प्रशासकीय शिस्त दिली, पण “गोड खाऊन शुभारंभ” ही संकल्पना भारतीय सांस्कृतिक परंपरेतून या प्रक्रियेत आली.

सामान्य भाषेत “मीठ खाल्लं की त्याला जागणं” अशी एक म्हण आहे, म्हणजे उपकाराची जाणीव ठेवणं. पण हलवा समारंभामागे असा कोणताही धार्मिक किंवा लोककथांवर आधारित अर्थ नाही. इथे “जागणं” म्हणजे भावनिक नव्हे, तर प्रशासकीय जबाबदारी. हलवा खाल्ल्यानंतर कर्मचारी देशाच्या अर्थसंकल्पाच्या गोपनीयतेसाठी पूर्णपणे जबाबदार होतात आणि ही गोड चव त्यांच्या गंभीर भूमिकेची प्रतीकात्मक जाणीव करून देते.

अर्थसंकल्प तयार करणं ही केवळ आकड्यांची जुळवाजुळव नाही. त्यामागे महिन्यांचे नियोजन, रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या बैठकां आणि आर्थिक, सामाजिक तसेच राजकीय परिणामांचा सखोल विचार असतो. अशा मेहनतीच्या सुरुवातीला हलवा वाटून कर्मचाऱ्यांचा सन्मान केला जातो आणि त्यांचं मनोबल वाढवण्याचा हा एक मानवी स्पर्श मानला जातो.

1947 नंतर भारत स्वतंत्र झाला, सरकार बदलली, अर्थमंत्री बदलले आणि बजेट सादरीकरणाची तारीखही बदलली, पण हलवा समारंभाची परंपरा मात्र कायम राहिली. आजही नॉर्थ ब्लॉकमध्ये दरवर्षी हा सोहळा पार पडतो आणि प्रशासनाच्या जुन्या परंपरेचा आधुनिक भारतातही मान राखला जातो.

एका बाजूला उकळणारा गोड हलवा आणि दुसऱ्या बाजूला बंद दाराआड देशाच्या आर्थिक भवितव्याची आकडेवारी छापली जात असते. हा विरोधाभासच या परंपरेला खास बनवतो. गोड चवीत सुरू होणारी ही प्रक्रिया देशाच्या खिशावर परिणाम करणाऱ्या निर्णयांचा पाया घालते.

हलवा समारंभ हा केवळ गोड पदार्थ नसून तो ब्रिटिश काळातील प्रशासकीय शिस्त, भारतीय सांस्कृतिक परंपरेतील शुभारंभाची भावना आणि आधुनिक भारताच्या आर्थिक व्यवस्थेतील गोपनीयतेचा कणा यांचा संगम आहे. म्हणूनच दरवर्षी बजेटच्या आधी एका कढईत ढवळला जाणारा हलवा हा केवळ पदार्थ न राहता, तो भारतीय प्रशासनाच्या गोड इतिहासाचं प्रतीक बनतो.

देशाच बजेट म्हणजे काही साधी तारीख नाही, तर तो एक राष्ट्रीय थ्रिल शो असतो. १ फेब्रुवारी जवळ आला की चहा टपरीपासून ते शेअर बाजारापर्यंत एकच चर्चा सुरू होते. “यावेळी खिशाला दिलासा मिळणार की अजूनच कात्री?” सकाळी ११ वाजता संसदेत अर्थमंत्री उभे राहतात आणि टीव्हीसमोर बसलेले सामान्य नागरिक, व्यापारी, शेतकरी आणि पगारदार वर्ग हातात रिमोट घेऊन जणू एखाद्या क्रिकेट मॅचचा शेवटचा ओव्हर पाहत असतात. एका वाक्यात कर वाढतो, तर दुसऱ्यात सवलत मिळते, आणि तिसऱ्यात नवीन योजना जाहीर होते. थोडक्यात सांगायचं तर, बजेटचा दिवस म्हणजे देशभरात एकाच वेळी आशा, धाकधूक आणि “यावेळी तरी आपल्यासाठी काहीतरी निघेल” अशी गोड अपेक्षा !


Related Articles

Back to top button