क्रीडाताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगड

टॅलेंट होते… पण व्यासपीठ नव्हते; रायगडच्या मुलींना संधी द्यायला २०२६ उजाडावे लागले!


सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम 

अलिबाग  |

रायगड जिल्ह्यात क्रिकेटची परंपरा जुनी असली, विविध स्तरांवर पुरुष क्रिकेट स्पर्धांचा गाजावाजा होत असला तरी महिला क्रिकेटपटूंना संघटित आणि व्यावसायिक व्यासपीठ मिळण्यासाठी मात्र २०२६ साल उजाडावे लागले. अखेर रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या पुढाकारातून जिल्ह्यात प्रथमच महिला टी-२० प्रीमियर लीग स्पर्धेला सुरुवात झाली आहे.
गव्हाण-उलवे येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर बुधवारी (दि.२८) स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला. रायगड जिल्ह्यातील उत्कृष्ट आणि उदयोन्मुख महिला क्रिकेटपटूंना एकत्र आणून त्यांना मोठ्या व्यासपीठावर खेळण्याची संधी मिळावी, या उद्देशाने स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याचे रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील यांनी सांगितले.

महिला क्रिकेटला चालना देत भविष्यात रायगडचा सक्षम महिला क्रिकेट संघ घडविण्याच्या दृष्टीने ही स्पर्धा महत्त्वाची मानली जात आहे. आतापर्यंत स्थानिक स्तरावर किंवा शालेय स्पर्धांपुरते मर्यादित राहिलेले अनेक महिला खेळाडू आता प्रथमच ‘प्रीमियर लीग’च्या वातावरणात खेळताना दिसणार आहेत.
स्पर्धेत समीरा हॅबिटेटेस अलिबाग जेट्स, खोपोली क्रिकेट असोसिएशन, अभि इलेव्हन अलिबाग आणि चॅम्पियन्स क्रिकेट अकॅडमी खारघर या चार संघांचा समावेश करण्यात आला आहे. स्पर्धा साखळी आणि बाद फेरी पद्धतीने खेळविण्यात येणार आहे.
स्पर्धेत सहभागी सर्व महिला खेळाडूंना आरडीसीएच्या वतीने रंगीत गणवेश देण्यात आले असून संपूर्ण स्पर्धा यूट्यूबवर लाइव्ह प्रसारित केली जाणार आहे. रायगडमधील नामवंत महिला खेळाडूंसह महाराष्ट्र संघात निवड झालेल्या खेळाडूंचाही यात सहभाग असणार आहे.
उद्घाटनप्रसंगी आरडीसीएचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील, उपाध्यक्ष राजेश पाटील, सहसचिव जयंत नाईक, सदस्य अरुण शिंदे, देवेंद्र पाटील, अभिजित तुळपुळे, मनोहर अहिर, छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट अकॅडमीचे अध्यक्ष अमित कडू, सुजित ठाकूर, विनय पाटील तसेच पंच, स्कोअरर्स, महिला खेळाडू आणि क्रिकेटप्रेमी उपस्थित होते.
महिला क्रिकेटला नवे व्यासपीठ देणाऱ्या या स्पर्धेमुळे रायगडच्या ग्रामीण भागातील अनेक मुलींची क्रिकेटची स्वप्ने आता प्रत्यक्ष मैदानावर उतरू लागल्याची भावना उपस्थितांकडून व्यक्त करण्यात आली.


Related Articles

Back to top button