ताज्या बातम्यादेश विदेशमहाराष्ट्रमुंबईरायगडसंपादकीय
80 वर्षाच्या वार्धक्याकडे झुकलेला शेकाप… पण क्रांतीची मशाल तरुणाईच्या हाती देण्याची हालचाल!
७९ व्या वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला 'जनरेशन शिफ्ट'चे पत्रकार परिषदेत स्पष्ट संकेत; युवाशक्तीवर विश्वास ठेवत शेकापच्या नव्या राजकीय पर्वाची वाटचाल

फडशा
सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
आविष्कार देसाई
राजकीय पक्षांचा इतिहास त्यांच्या स्थापनेच्या तारखांनी लिहिला जातो; पण त्यांचे भविष्य पुढच्या पिढीवर ठेवलेल्या विश्वासाने ठरत असते. शेतकरी कामगार पक्षाच्या ७९ व्या वर्धापन दिनाच्या पूर्वसंख्येला झालेल्या पत्रकार परिषदेत नेमक हेच वैचारिक स्थित्यंतर प्रकर्षाने जाणवले. वार्धक्याकडे झुकलेल्या आणि ऐंशी वर्षांच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या शेकापने आता आपल्या राजकारणाचा केंद्रबिंदू युवकांकडे वळविण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट संकेत आजच्या पत्रकार परिषदेतून मिळाले आहेत. शेकापच्या राज्य प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांच्या वक्तव्यातून असे जाणवले की, शेकापला आता नुसता आपल्या ऐतिहासिक वारशाचा अभिमान बाळगायचा नाही, तर ती क्रांतीची मशाल नव्या पिढीच्या हाती सोपवून भविष्यात राजकारणात नवी मुसंडी मारायची आहे.
हा संदेश केवळ बोलण्यातून आलेला नाही, तर कृतीतून दिला गेला आहे. यंदा प्रथमच पक्षाचा ध्वज युवा नेत्या ॲड. सौम्या कोरडे यांच्या हस्ते फडकविण्याचा निर्णय हा केवळ सन्मानाचा विषय नाही; तो शेकापच्या राजकीय संक्रमणाचा अधिकृत उद्घोष आहे. राजकारणात प्रतीकांना अनन्यसाधारण महत्त्व असते. ध्वज कोण फडकवतो, व्यासपीठावर कोण उभे राहते आणि पुढील रांगेत कोणाला स्थान मिळते, यातूनच पक्षाचा पुढील चेहरा निश्चित होत असतो. त्यामुळे सौम्या कोरडे यांच्या हस्ते होणारे ध्वजारोहण म्हणजे शेकापने आपले लक्ष पुढील पिढीवर केंद्रित केल्याचे दिसून येते.
खालापूर येथे रविवारी(ता. 2) होणाऱ्या शेतकरी कामगार पक्षाच्या वर्धापन दिनाला राज्यभरातील कार्यकर्ते, पदाधिकारी आणि विशेष करून युवाशक्तीने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन चित्रलेखा पाटील यांनी केले आहे.
गेली आठ दशके शेकापने शेतकरी, कामगार आणि कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी संघर्ष केला. महाराष्ट्राच्या राजकारणात वैचारिक राजकारणाचा लाल बावटा उंच ठेवला. पण प्रत्येक विचाराला काळानुसार नवी भाषा आणि नवे नेतृत्व मिळाले नाही, तर इतिहासाचे ओझे वर्तमानावर पडते, असे म्हणतात. शेकापने ही वस्तुस्थिती ओळखल्याचे दिसते. म्हणूनच आज शेतकरी भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेतून पक्षाने आता आपले राजकारण युवकांच्या प्रश्नांशी जोडण्याचा निर्णय घेतला आहे.
जंतर-मंतरवरील आंदोलन हा त्याचाच पहिला ठोस पुरावा होता. नीट परीक्षेतील कथित गैरव्यवहार, पेपरफुटी, विद्यार्थ्यांवरील मानसिक ताण, काही तरुणांनी केलेल्या आत्महत्या आणि त्यातून निर्माण झालेला संताप यावर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या; पण शेकापने रस्त्यावर उतरून संघर्षाची भूमिका घेतली. हा संघर्ष केवळ विद्यार्थ्यांसाठी नव्हता; तो युवकांच्या भविष्यावर घाला घालणाऱ्या व्यवस्थेविरुद्धचा होता. याच आंदोलनाने शेकापच्या राजकारणात एक नवा अध्याय सुरू झाल्याचे संकेत दिले. बदल ओळखणारा पक्षच उद्याचे राजकारण घडवू शकतो. शेकापने ही दिशा स्वीकारली असेल, तर ती स्वागतार्ह आहे.
पण येथेच खरी परीक्षा सुरू होते. युवकांच्या हस्ते ध्वजारोहण करणे सोपे आहे; त्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लढणे अवघड आहे. रोजगार, स्पर्धा परीक्षा, पेपरफुटी, कौशल्य विकास, कृषी उद्योजकता, स्थलांतर आणि डिजिटल युगातील संधी यांसारख्या प्रश्नांवर शेकापने सातत्यपूर्ण संघर्ष उभा केला, तरच युवकांचा विश्वास मिळेल. अन्यथा हे परिवर्तन एका दिवसाच्या सोहळ्यापुरतेच मर्यादित राहील.
शेकापच्या लाल बावट्यालाही आता नव्या अर्थाची गरज आहे. हा बावटा फक्त शेतकरी आणि कामगारांचा राहू नये; तो अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या प्रत्येक तरुणाचा झेंडा व्हायला हवा. शेतात राबणारा तरुण, स्पर्धा परीक्षेतील अन्यायाविरोधात आंदोलन करणारा विद्यार्थी, नोकरीच्या शोधात भटकणारा पदवीधर आणि स्वतःचा उद्योग उभा करण्यासाठी झगडणारा युवक. या सर्वांना जर शेकापने एकाच संघर्षात जोडले, तर पक्षाचा लाल बावटा नव्या पिढीच्या हातात अधिक जोमाने फडकेल, असे दिसते.
७९ व्या वर्धापन दिनाचा सर्वात मोठा संदेश म्हणजे शेकापने आपल्या भूतकाळाचा अभिमान सोडलेला नाही; पण तो भविष्याच्या पिढीच्या स्वप्नांशी जोडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. ही दिशा योग्य आहे. मात्र आता प्रतीकांपलीकडे जाऊन संघटनात्मक बदल, युवकांना निर्णय प्रक्रियेत स्थान, नव्या नेतृत्वाची निर्मिती आणि सातत्यपूर्ण जनआंदोलन यांची जोड द्यावी लागेल.
राजकारणात इतिहास पक्षाला ओळख देतो; पण भविष्य त्याला युवा शक्ती देतो. शेकापने युवाशक्तीवर विश्वास ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आता हा विश्वास कृतीत उतरविण्याची वेळ आली आहे. कारण महाराष्ट्राचे उद्याचे राजकारण त्या पक्षाचे असेल, जो युवकांना केवळ सभांमध्ये गर्दी गोळा करण्यासाठी अथवा टाळ्या वाजवण्यासाठी नाही, तर नेतृत्व करण्यासाठी व्यासपीठ देईल.
ऐंशी वर्षांचा संघर्षमय इतिहास शेकापच्या पाठीशी आहे; आता पुढील ऐंशी वर्षांचे भविष्य युवकांच्या हाती सोपविण्याची वेळ आली आहे. त्याची प्रतीकात्मक सुरुवात झाली आहे. मात्र, उद्या होणाऱ्या अधिवेशनात पक्षाचे सर्वोच्च नेतृत्व युवकांना केवळ प्रेरणेचा कानमंत्र देणार की निर्णय प्रक्रियेतील खऱ्या सहभागाचे आश्वासन देणार, यावरच या ‘जनरेशन शिफ्ट’चे यश अवलंबून असेल. “कारण इतिहास वारशाने मिळतो; पण भविष्य पुढच्या पिढीवर ठेवलेल्या विश्वासाने घडत असते.”
…..




