लाडक्या बहिणींसाठी अदिती तटकरे यांचा वेगवान पाठपुरावा; आर्थिक सक्षमीकरणाला महायुती सरकारचा हातभार
जुलैच्या सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया सुरू; पुढील २-३ दिवसांत आधार संलग्न खात्यांमध्ये निधी जमा होणार

सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
मुंबई |
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थी महिलांना जुलै महिन्याचा सन्मान निधी वेळेत मिळावा, यासाठी महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांच्या पाठपुराव्याने निधी वितरणाची तांत्रिक प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आली आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत राज्यातील सर्व पात्र लाभार्थी महिलांच्या आधार संलग्न बँक खात्यांमध्ये हा सन्मान निधी थेट जमा होणार आहे.
रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील लाडक्या बहिणींना सन्मान निधीची भेट मिळणार असल्याने महिलांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला बळ देणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना नियमित आर्थिक मदत उपलब्ध करून देण्यात येत आहे.
महिलांच्या खात्यात सन्मान निधी वेळेत पोहोचावा, यासाठी शासनाच्या संबंधित विभागांकडून आवश्यक तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. आधार संलग्न बँक खात्यांमध्ये थेट निधी जमा होणार असल्याने पात्र लाभार्थींना या रकमेचा थेट लाभ मिळणार आहे.
महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले की, रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचा सन्मान निधी वेळेत मिळावा, यासाठी वितरण प्रक्रियेला गती देण्यात आली आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत सर्व पात्र लाभार्थी महिलांच्या आधार संलग्न बँक खात्यांमध्ये निधी जमा होईल.
महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला प्राधान्य देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा विश्वास आणि महायुती सरकारचा दृढ निश्चय यांच्या बळावर ही योजना यापुढेही अधिक प्रभावीपणे सुरू राहील, असा विश्वास अदिती तटकरे यांनी व्यक्त केला.



