ताज्या बातम्यादेश विदेशमहाराष्ट्रमुंबईरायगड
रायगडमध्ये मुलींच्या आरोग्यासाठी सुरक्षा कवच मोहीम, गर्भाशयाच्या कर्करोगापासून संरक्षण देण्यासाठी एचपीव्ही लसीकरणाला जिल्हा रुग्णालय सुरुवात
१४ ते १५ वयोगटातील मुलींना मोफत लस घेण्याचे पालकांना आवाहन, पुढील तीन महिन्यात 16000 मुलींना लस देण्याचे उद्दिष्ट

सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
अलिबाग |
महिला व मुलींच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असलेल्या ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस (एचपीव्ही) लसीकरण मोहिमेचा राज्यस्तरीय शुभारंभ रविवारी आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून करण्यात आला. या पार्श्वभूमीवर अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात सोमवारी (ता. ९) पासून एचपीव्ही लसीकरणास सुरुवात करण्यात आली आहे. 14 ते 15 वयोगटातील जिल्ह्यातील 16 हजार मुलींना गार्डासिल
ही लस देण्यात येणार आहे. सदरची लसीकरण मोहीम पुढील तीन महिने सुरू राहणार आहे
आरोग्य विभागामार्फत रायगड जिल्ह्यातील सर्व पात्र मुलींना ही लस उपलब्ध करून दिली जाणार आहे. या मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी किशन जावळे आणि रायगड जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी तयारी, नियोजन, विविध विभागांमधील समन्वय, लसीकरण सत्रांचे नियोजन, मानव संसाधन उपलब्धता, कोल्ड चेन व्यवस्था तसेच जनजागृती मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत संबंधित विभागांना आवश्यक सूचना दिल्या आहेत.
बदलत्या जीवनशैलीमुळे महिलांमध्ये गर्भाशय मुख कर्करोगाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येत आहे. या आजाराला आळा घालण्यासाठी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर तसेच राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या पुढाकाराने १४ वर्षे पूर्ण झालेल्या पण १५ वर्षांखालील मुलींना एचपीव्ही लस देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
एचपीव्ही संसर्ग हा गर्भाशयमुखाच्या कर्करोगाचा प्रमुख कारणीभूत घटक मानला जातो. वेळेत लसीकरण केल्यास या आजारापासून मोठ्या प्रमाणात संरक्षण मिळू शकते. त्यामुळे किशोरवयीन मुलींचे लसीकरण हा प्रभावी प्रतिबंधात्मक उपाय मानला जात आहे. सरकारच्या या निर्णयामुळे विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे.
लसीकरणानंतर मुलींनी आरोग्य केंद्रात किमान ३० मिनिटे थांबणे आवश्यक आहे. काही वेळा हलका ताप किंवा इंजेक्शन दिलेल्या जागी दुखणे यासारखी किरकोळ लक्षणे दिसू शकतात. ही लक्षणे साधारणपणे २ ते ३ दिवसांत कमी होतात.
रायगड जिल्ह्यातील पालक व नागरिकांनी आपल्या १४ ते १५ वयोगटातील मुलींना गर्भाशयमुखाच्या कर्करोगापासून संरक्षण मिळवण्यासाठी लसीकरण करून घ्यावे आणि या महत्त्वपूर्ण सार्वजनिक आरोग्य मोहिमेला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी किशन जावळे, रायगड जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निशिकांत पाटील आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्राची नेहूलकर यांनी केले आहे.
…..
पोर्टलवर व प्रत्यक्ष नोंदणीची सुविधा
१४ वर्षे पूर्ण झालेल्या (१४ ते १५ वयोगटातील) मुलींना हे लसीकरण दिले जाणार आहे. अलिबाग जिल्हा रुग्णालयात सकाळी ९ ते १ या ओपीडीच्या वेळेत लसीकरण सुरू आहे.
या मोहिमेअंतर्गत “गार्डासिल” एचपीव्ही लस दिली जाणार असून या वयोगटातील मुलींसाठी फक्त एकच डोस संरक्षणासाठी पुरेसा असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, पालकांना ‘U-Win’ पोर्टलवर स्वतः नोंदणी करता येईल. तसेच लसीकरण केंद्रावर प्रत्यक्ष जाऊनही नोंदणीची सुविधा उपलब्ध आहे.
…..
लस कोणी शोधून काढली?
…..

इयान फ्रेझर हे ऑस्ट्रेलियातील प्रसिद्ध इम्युनोलॉजिस्ट (रोगप्रतिकारशास्त्र तज्ज्ञ) असून त्यांचा जन्म ६ जानेवारी १९५३ रोजी स्कॉटलंडमधील ग्लासगो येथे झाला. त्यांनी एडिनबर्ग विद्यापीठ येथे वैद्यकीय शिक्षण घेतले आणि नंतर ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँड विद्यापीठ येथे संशोधन सुरू केले. एचपीव्ही व्हायरसच्या रचनेवर संशोधन करताना त्यांनी व्हायरससारखे दिसणारे पण संसर्ग न करणारे व्हायरस-लाइक पार्टिकल्स (व्हीएलपी) तयार करण्याचे तंत्र विकसित केले. या तंत्रामुळे शरीरात त्या व्हायरसविरुद्ध प्रतिकारशक्ती तयार होते आणि याच संशोधनावर पुढे एचपीव्ही लसींचा विकास झाला. विशेष म्हणजे इयान फ्रेझर हे वैद्यकीय संशोधन क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांच्या कार्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली आहे.
……

जियान झोऊ हे चीनमध्ये जन्मलेले व्हायरोलॉजिस्ट होते. त्यांचा जन्म १९५७ मध्ये चीनमधील हांगझोउ येथे झाला. त्यांनी ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँड विद्यापीठ येथे इयान फ्रेझर यांच्यासोबत संशोधन करत एचपीव्ही व्हायरसच्या बाहेरील प्रथिनांपासून व्हायरस-लाइक पार्टिकल्स तयार करण्याची पद्धत प्रयोगशाळेत यशस्वीपणे विकसित केली. या शोधाला १९९१ मध्ये पेटंट मिळाले आणि त्याच संशोधनावर पुढे एचपीव्ही लस तयार करण्यात आली. दुर्दैवाने १९९९ मध्ये कॅन्सरमुळे जियान झोऊ यांचे निधन झाले, त्यामुळे एचपीव्ही लस प्रत्यक्ष वापरात येण्याआधीच ते जगाचा निरोप घेऊन गेले.




