ताज्या बातम्यादेश विदेशमहाराष्ट्रमुंबईरायगड

जन्माआधीच पुराशी झुंज; दोन अजन्म बाळांसाठी मृत्यूला हरवणारी बचावमोहीम

रावे आणि तांबडशेत येथे पुराच्या विळख्यात अडकलेल्या नऊ महिन्यांच्या दोन गर्भवती महिलांची थरारक सुटका; प्रशासनाची तत्परता आणि 'आपदा मित्रां'च्या धाडसामुळे दोन मातांसह गर्भातील दोन बाळांचेही प्राण वाचले


सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम 
अलिबाग
एखाद्या नव्या जीवाचे जगात आगमन होण्याआधीच त्याला पुराच्या महाभयंकर संकटाशी सामना करावा लागावा, अशी कल्पनाही अंगावर शहारे आणणारी आहे. मात्र रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील रावे आणि तांबडशेत या गावांमध्ये अशीच हृदयस्पर्शी आणि थरारक घटना घडली. पुराच्या पाण्याने चारही बाजूंनी वेढलेल्या या गावांत प्रसूतीच्या उंबरठ्यावर असलेल्या दोन नऊ महिन्यांच्या गर्भवती महिला अडकल्या होत्या. त्यांच्या पोटी वाढणाऱ्या दोन अजन्म बाळांचेही आयुष्य धोक्यात आले होते. अशा वेळी जिल्हा प्रशासनाच्या तातडीच्या हालचाली आणि ‘आपदा मित्र’ अभिकेत म्हात्रे व राजेश म्हात्रे यांच्या धाडसी बचाव मोहिमेमुळे दोन मातांसह गर्भातील दोन बाळांचे प्राण सुरक्षित राहिले.
रावे येथील पायल राजेश पाटील (वय २३) यांना तातडीने रुग्णालयात दाखल करणे आवश्यक असल्याची माहिती जिल्हा परिषद आरोग्य समितीचे सभापती वैकुंठ पाटील यांनी निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदेश शिर्के यांना दिली. त्यांनी तत्काळ जिल्हाधिकारी किशन जावळे यांना माहिती देत बचाव पथक रवाना करण्याच्या सूचना केल्या.
मात्र रावे गावाचा संपर्क पूर्णपणे तुटला होता. पुराच्या प्रचंड वेगामुळे आणि पाण्याच्या वाढलेल्या पातळीमुळे मासेमारीची बोट वापरणे शक्य नव्हते. त्यामुळे शासनाकडून उपलब्ध असलेल्या रबर बोटीच्या सहाय्याने बचाव मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. पुराच्या वेगवान प्रवाहात जीवाची पर्वा न करता आपदा मित्र अभिकेत म्हात्रे आणि राजेश म्हात्रे यांनी रबर बोटीतून गाव गाठले. पायल पाटील यांच्यासह अन्य चार जणांना सुरक्षित बाहेर काढून आधीच सज्ज ठेवलेल्या रुग्णवाहिकेतून तातडीने पेण येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.
पहिली मोहीम यशस्वीपणे पूर्ण होताच तांबडशेत गावातून आणखी एका नऊ महिन्यांची गर्भवती  महिला पुरात अडकल्याचा संदेश प्रशासनाला मिळाला. क्षणाचाही विलंब न करता हेच पथक पुन्हा दुसऱ्या बचाव मोहिमेसाठी रवाना झाले. पुराच्या वेगवान पाण्यातून मार्ग काढत त्यांनी तांबडशेत येथील गर्भवती महिलेलाही सुरक्षित बाहेर काढले आणि वेळेत वैद्यकीय उपचार उपलब्ध करून दिले.
सलग दोन अत्यंत जोखमीच्या बचाव मोहिमा यशस्वी करत आपदा मित्र अभिकेत म्हात्रे आणि राजेश म्हात्रे यांनी धाडस, प्रसंगावधान आणि सेवाभावाचा प्रेरणादायी आदर्श घालून दिला. जिल्हा प्रशासनाचा प्रभावी समन्वय, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेची तत्परता, सज्ज रुग्णवाहिका आणि आपदा मित्रांचे धैर्य यामुळे दोन मातांसह त्यांच्या गर्भातील दोन अजन्म बाळांचेही आयुष्य सुरक्षित राहिले.
रावे आणि तांबडशेत परिसरातील नागरिकांनी या बचाव मोहिमेबद्दल जिल्हा प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आणि धाडसी आपदा मित्रांचे मनापासून आभार मानले. ही मोहीम केवळ दोन महिलांच्या सुटकेची नव्हती, तर जन्माआधीच संकटाशी झुंज देणाऱ्या दोन नव्या जीवांना सुरक्षित भविष्य देणारी मानवी संवेदनांची आणि धाडसाची प्रेरणादायी कहाणी ठरली.

Related Articles

Back to top button