ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगड
लालबावट्याने फडकवले काळे झेंडे, तर धनुष्यातून निघाले निषेधाचे बाण
मुरुडच्या दरड दुर्घटनेचे पडसाद अलिबागपर्यंत : चित्रलेखा पाटील व मानसी दळवी यांच्या विरोधात आंदोलनं

सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
रायगड : मुरुड तालुक्यातील मिठेखार येथे झालेल्या दरड दुर्घटनेत एका वयोवृद्ध महिलेचा मृत्यू झाला. या दुःखद घटनेनंतर घटनास्थळी झालेल्या हाणामारीने राजकारण पेटवले असून, त्याचे पडसाद थेट जिल्ह्याच्या मुख्यालयी अलिबागपर्यंत उमटले. एका बाजूला लालबावटा घेऊन शेकापच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे फडकवले, तर दुसऱ्या बाजूला धनुष्यबाणाच्या प्रतिकाखाली शिवसैनिकांनी घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला. चित्रलेखा पाटील आणि मानसी दळवी यांच्या परस्पर विरोधात झालेल्या या निषेध आंदोलनामुळे अलिबागचे राजकीय वातावरण तापले.

शेकापचा आक्रमक पवित्रा : मानसी दळवी यांच्या विरोधात घोषणाबाजी
शेकापक्षाने अलिबागमध्ये निषेधाचे रणशिंग फुंकले. कार्यकर्त्यांनी काळे झेंडे फडकवत मानसी दळवी यांच्या विरोधात घोषणाबाजी केली.
शेकापक्षाच्या नेत्यांनी आरोप केला की,
“आपत्तीच्या काळातही शिवसेना लोकांच्या वेदना न समजून गोंधळ निर्माण करत आहे. मानसी दळवी यांनी केलेल्या वर्तनाचा निषेध केला पाहिजे,” अशी टीका करण्यात आली.
शिवसेनेची प्रत्युत्तरात हाक : चित्रलेखा पाटील यांच्या विरोधात संताप

दरम्यान, अलिबागमध्ये शिवसेनेतर्फे मोठ्या संख्येने आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी “चित्रलेखा पाटील यांच्या विरोधी घोषणांनी वातावरण दणाणून सोडले. पदाधिकारी, स्थानिक शिवसैनिक आणि कार्यकर्त्यांसोबत महिलांचा सहभाग विशेष लक्षणीय होता. महिला कार्यकर्त्यांनी आघाडी घेत पाटील यांच्या विरोधात आवाज बुलंद केला.
शिवसेना नेत्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, “आपत्तीग्रस्तांचे दुःख दूर करण्याऐवजी काहीजण राजकारण करून लोकांच्या जखमा चिघळवत आहेत. जनता अशा वर्तनाला माफ करणार नाही,” असा इशारा देण्यात आला.
दोन्ही पक्ष आमनेसामने
शिवसेना आणि शेका पक्षाच्या निषेध आंदोलनांमुळे अलिबागमध्ये चांगलेच राजकीय तापमान वाढले. एका बाजूला धनुष्यबाण तर दुसऱ्या बाजूला लालबावटा – अशा प्रतिकात्मक लढाईत महिलांचा सहभाग ठळकपणे जाणवला. रस्त्यावरचे घोषणाबाजीचे रणांगण पाहून नागरिकही चकित झाले.
पुढील घडामोडींवर नजर
दरड दुर्घटनेतून सुरू झालेला संघर्ष आता जिल्हास्तरीय आंदोलनात रूपांतरित झाला आहे. दोन्ही पक्ष आपापली भूमिका ठामपणे मांडत असल्याने पुढील काही दिवसांत हा वाद आणखी चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत. रायगड जिल्ह्याच्या राजकारणात या घटनेने नव्या संघर्षाचे चित्र स्पष्ट झाले आहे.




