ताज्या बातम्यादेश विदेशमहाराष्ट्रमुंबईरायगडसंपादकीय

राज्यसभेचा धक्का की विधानसभेची तयारी? धैर्यशील पाटील यांच्या राजकीय समीकरणांची नवी दिशा

राज्यसभेचा निर्णय की पेण विधानसभेसाठी भाजपचा ‘मास्टर प्लॅन’?


फडशा
सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम 
आविष्कार देसाई 
अलिबाग  |
राजकारणात एखादे पद न मिळणे म्हणजे राजकीय शेवट असतोच असे नाही. अनेकदा ते मोठ्या राजकीय भूमिकेची सुरुवात असते. राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपने धैर्यशील पाटील यांना पुन्हा संधी न दिल्याने वरवर पाहता त्यांचा पत्ता कापल्याचे चित्र उभे राहिले. मात्र रायगड–पेणच्या राजकारणातील हालचाली पाहता हा निर्णय केवळ राज्यसभेपुरता नसून पुढील मोठ्या राजकीय समीकरणाची नांदी असल्याची चर्चा रंगू लागली आहे.
साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले लोकसभेवर निवडून गेल्यानंतर रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर २०२४ मध्ये धैर्यशील पाटील यांना संधी देण्यात आली होती. मात्र हा कार्यकाळ केवळ १७ महिन्यांचा असल्याने तो तात्पुरता असल्याचे आधीपासून स्पष्ट होते. आता नव्या राज्यसभा निवडणुकीत भाजपने विनोद तावडे, रामदास आठवले, माया ईवनाते आणि रामराव वडकुते यांची नावे जाहीर केली आणि धैर्यशील पाटील यांचे नाव यादीतून गायब झाले.
यामुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू झाली आहे. भाजपने धैर्यशील पाटील यांना बाजूला केले का?
मात्र रायगड जिल्ह्यातील राजकीय घडामोडी वेगळेच चित्र दाखवत आहेत. जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप एकत्र येऊन सत्ता स्थापनेची शक्यता व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर पेणचे आमदार तथा माजी मंत्री रवींद्र पाटील यांचे सुपुत्र वैकुंठ पाटील जिल्हा परिषदेमध्ये सक्रिय झाले आहेत. रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदासाठी त्यांच्या नावाची चर्चा आहे.
यामुळे पेणच्या राजकारणात पिढीबदलाचे संकेत स्पष्ट दिसू लागले आहेत. वयोमानामुळे रवींद्र पाटील यांना पुन्हा विधानसभेची संधी मिळण्याची शक्यता कमी असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जाते. अशा परिस्थितीत भाजपने पेण विधानसभेसाठी नवे समीकरण तयार करण्यास सुरुवात केल्याची चर्चा आहे. त्या समीकरणाच्या केंद्रस्थानी धैर्यशील पाटील यांचे नाव पुढे येत आहे.
धैर्यशील पाटील हे केवळ संसदेत बसणारे नेते नाहीत. ते आंदोलनातून घडलेले, अभ्यासू आणि प्रभावी वक्तृत्व असलेले नेते म्हणून ओळखले जातात. शेतकरी कामगार पक्षाच्या राजकीय परंपरेत वाढलेले असल्यामुळे त्यांना ग्रामीण प्रश्न, शेतकरी चळवळी आणि स्थानिक राजकारणाचा तळ गाठण्याची क्षमता त्यांच्यामध्ये निश्चितच आहे.
यामुळेच राज्यसभेच्या तुलनेत थेट जनतेशी संपर्क असलेल्या विधानसभेच्या राजकारणात ते अधिक प्रभावी ठरू शकतात, असा विश्वास भाजप नेतृत्वालाही वाटत असल्याची चर्चा आहे.
म्हणूनच सध्या जरी “धैर्यशील पाटील यांना भाजपने बाजूला केले” अशी चर्चा रंगत असली तरी, प्रत्यक्षात हा निर्णय त्यांच्या राजकीय भवितव्यासाठी नवे दार उघडणारा ठरू शकतो. रायगड–पेण परिसरात भाजपचा प्रभाव वाढवण्याच्या दृष्टीने धैर्यशील पाटील यांच्यासारखा स्थानिक पातळीवर प्रभावी नेता विधानसभेत उतरवणे हा पक्षाचा दीर्घकालीन राजकीय डाव असू शकतो.
राजकारणात खुर्चीपेक्षा वेळ महत्त्वाची असते. राज्यसभेची खुर्ची गेली असली तरी पेणच्या राजकारणात पुढील मोठा खेळ कोणाच्या हातात असणार, याची झलक या निर्णयातून दिसत असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.
राजकारणात धक्का आणि संधी यामधील रेषा फारच पातळ असते. त्यामुळे राज्यसभेची संधी न मिळाल्याने निर्माण झालेला हा धक्का पुढील काळात धैर्यशील पाटील यांच्या राजकीय कारकिर्दीत नवी संधी ठरतो का, हे पाहणे महत्वाचे करणार आहे.

Related Articles

Back to top button