क्रीडाताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगड

‘नगराध्यक्ष चषक’साठी अलिबाग सज्ज! जलतरण तलावात १९ जुलैला रंगणार रायगडातील जलतरणवीरांची महास्पर्धा

६ वर्षांच्या चिमुकल्यांपासून खुल्या गटातील जलतरणपटूंपर्यंत सर्वांना संधी; विजेत्यांचा पदके आणि प्रमाणपत्राने होणार गौरव


सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम

अलिबाग

रायगड जिल्ह्यातील जलतरणपटूंच्या क्रीडा कॅलेंडरमधील बहुप्रतिक्षित स्पर्धा असलेल्या ‘नगराध्यक्ष चषक’ जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेचा जल्लोष यंदा अलिबागमध्ये रंगणार आहे. रविवार, १९ जुलै २०२६ रोजी स्व. नमिता नाईक क्रीडा संकुलाच्या अत्याधुनिक जलतरण तलावात ॲक्वाटिक असोसिएशन ऑफ रायगड आणि स्व. नमिता नाईक क्रीडा संकुल यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

अलिबागच्या नगराध्यक्षा अक्षया प्रशांत नाईक यांच्या नावाने आयोजित करण्यात आलेली ही स्पर्धा जिल्ह्यातील नवोदित जलतरणपटूंना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासोबतच स्पर्धात्मक जलतरण संस्कृतीला चालना देणारी ठरणार आहे.

स्पर्धेत ६ वर्षांपासून १६ वर्षांखालील मुला-मुलींसह खुल्या गटातील महिला व पुरुष जलतरणपटू सहभागी होऊ शकणार आहेत. फ्रीस्टाइल, बॅकस्ट्रोक, ब्रेस्टस्ट्रोक आणि बटरफ्लाय या चार प्रमुख प्रकारांमध्ये विविध अंतरांच्या स्पर्धा होणार असून दिवसभर जलतरण तलावात वेग, कौशल्य आणि जिद्दीची रोमांचक लढत पाहायला मिळणार आहे.

सर्व स्पर्धकांनी सकाळी ९ वाजेपर्यंत उपस्थित राहावे, असे आयोजकांनी आवाहन केले आहे. प्रत्येक प्रकारातील प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना पदके व प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात येणार आहे.

स्पर्धेसाठी नोंदणी ऑनलाईन गुगल फॉर्मद्वारे तसेच प्रत्यक्ष स्पर्धास्थळी करता येणार आहे. नोंदणीवेळी आधार कार्ड अथवा जन्मदाखला, पासपोर्ट आकाराचा फोटो, नोंदणी शुल्क आणि सहभागी होणाऱ्या स्पर्धेची माहिती सादर करणे आवश्यक राहणार आहे.

स्पर्धेचे उद्घाटन नगराध्यक्षा अक्षया नाईक आणि गटनेते प्रशांत नाईक यांच्या हस्ते होणार असून मुख्याधिकारी सागर साळुंखे, उपनगराध्यक्षा मानसी म्हात्रे तसेच सर्व नगरसेवक आणि नगरसेविका यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
रायगड जिल्ह्यातील अधिकाधिक जलतरणपटूंनी या स्पर्धेत सहभागी होऊन आपल्या कौशल्याची छाप पाडावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. अधिक माहितीसाठी ८९८३८९५३०७ किंवा ९५२२०३५०७५ या क्रमांकांवर संपर्क साधावा.


Related Articles

Back to top button