ताज्या बातम्यादेश विदेशमहाराष्ट्रमुंबईरायगड

सोनम वांगचुकसह … लोकशाही उपोषणावर?; जंतर-मंतरवरून ‘लोकशाहीवादी जनएकजुटी’ची शेकाप प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांची हाक

शांततापूर्ण आंदोलनावरील कारवाईनंतर शेतकरी, कामगार, युवक, विद्यार्थी आणि सर्व लोकशाहीवादी शक्तींनी संविधान व लोकशाही रक्षणासाठी एकत्र यावे, असे आवाहन


सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम 
नवी दिल्ली |
पर्यावरणवादी आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञ सोनम वांगचुक यांच्या शांततापूर्ण आंदोलनावर झालेल्या कारवाईनंतर आता हा लढा केवळ एका व्यक्तीचा राहिलेला नसून देशातील लोकशाही, पर्यावरण आणि घटनात्मक अधिकारांच्या संरक्षणाचा बनला आहे. त्यामुळे शेतकरी, कामगार, युवक, विद्यार्थी, महिला, पर्यावरणवादी आणि सर्व लोकशाहीवादी शक्तींनी व्यापक एकजूट करत लोकशाही मूल्यांच्या संरक्षणासाठी एकत्र उभे राहण्याची गरज असल्याचे प्रतिपादन भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी जंतर-मंतर येथे केले.
चित्रलेखा पाटील यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन उपोषणकर्ते सोनम वांगचुक, अभिजीत दिपके यांची भेट घेत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी त्यांनी दिपके यांना शेतकरी कामगार पक्ष त्यांच्या लोकशाही मार्गाने सुरू असलेल्या संघर्षाच्या पाठीशी ठामपणे उभा असल्याचा विश्वास दिला.
यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, सोनम वांगचुक आणि अभिजीत दिपके यांचे उपोषण पूर्णपणे शांततापूर्ण आणि लोकशाही मार्गाने सुरू होते. पर्यावरणासाठी आयुष्य वाहिलेल्या एका शास्त्रज्ञाशी अशा प्रकारे वागणे निषेधार्ह आहे. आजचा युवक हे सर्व बारकाईने पाहत असून, लोकशाहीत शांततेने आंदोलन करणाऱ्यांशी अशी वागणूक दिली जात असेल, तर तो गंभीर चिंतेचा विषय आहे.
त्या पुढे म्हणाल्या की, आंदोलन करणे हा भारतीय संविधानाने दिलेला लोकशाही अधिकार आहे. अशा आंदोलनावर संवादाऐवजी पोलिसी कारवाई करणे हा योग्य मार्ग नाही. सरकारने आंदोलनकर्त्यांशी तातडीने संवाद साधून त्यांच्या प्रश्नांवर स्पष्ट भूमिका मांडली पाहिजे.
चित्रलेखा पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला की, “वीस दिवस सरकार शांत का होते? आणि संसदेवर मोर्चा निघण्याच्या आधीच कारवाई का करण्यात आली? या वेळेबाबत सरकारने देशाला उत्तर द्यावे.”
त्या म्हणाल्या, “जर शांततेच्या मार्गाने उपोषण करणाऱ्या एका शास्त्रज्ञालाही सरकार घाबरत असेल, तर तो सरकारच्या आत्मविश्वासाचा नव्हे, तर असुरक्षिततेचा संकेत आहे. सरकारने सोनम वांगचुक यांना आंदोलनस्थळावरून हटवले असेल; पण त्यांनी उपस्थित केलेले प्रश्न हटवता येणार नाहीत. जंतर-मंतर हे देशातील लोकशाही आंदोलनांचे प्रतीक आहे. आंदोलनकर्त्यांना तेथून हटवून प्रश्न संपत नाहीत.”
शेतकरी कामगार पक्ष हा संघर्ष आणि जनआंदोलनांची परंपरा असलेला पक्ष असून, लोकशाही आणि संविधानिक मूल्यांच्या रक्षणासाठी सुरू असलेल्या प्रत्येक शांततापूर्ण संघर्षाच्या पाठीशी ठामपणे उभा राहील, अशी ग्वाहीही चित्रलेखा पाटील यांनी दिली.
…..

Related Articles

Back to top button