ताज्या बातम्यादेश विदेशमहाराष्ट्रमुंबईरायगड

राज्यसभा निवडणुकीत भाजपचा ‘चार पत्त्यांचा’ डाव; महाराष्ट्रातून 4 उमेदवारांची घोषणा


सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम 

मुंबई  | 
आगामी राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रातून आपल्या चार उमेदवारांची घोषणा केली आहे. भाजपने रामदास आठवले, विनोद तावडे, माया चिंतामण इवनाते आणि रामराव वडकुते यांना राज्यसभेसाठी उमेदवारी दिली आहे. महाराष्ट्रातून यावेळी एकूण सात जागांसाठी निवडणूक होत असून विधानसभा संख्याबळाच्या गणितात भाजप मजबूत स्थितीत असल्याने पक्षाने चार उमेदवार रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे.
उमेदवारांची निवड करताना भाजपने विविध समाजघटकांना प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येते. मराठा, आदिवासी, ओबीसी तसेच मागासवर्गीय समाजाला संधी देत सामाजिक समतोल राखण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्याचबरोबर विदर्भ, मराठवाडा आणि कोकण या प्रदेशांचाही विचार करून प्रादेशिक समतोल साधण्याचा प्रयत्न भाजपने केल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
दरम्यान, निवडणूक आयोगाने देशातील दहा राज्यांतील 37 राज्यसभा जागांसाठी निवडणूक जाहीर केली असून 16 मार्च 2026 रोजी मतदान होणार आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक सात जागांसाठी निवडणूक होत असल्यामुळे राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विधानसभा संख्याबळानुसार एका राज्यसभा जागेसाठी सुमारे 36 आमदारांचा कोटा आवश्यक असतो. महायुतीकडे असलेल्या आमदारसंख्येमुळे भाजपला तीन जागा सहज मिळू शकतात, तर अतिरिक्त मतांच्या जोरावर चौथ्या जागेचीही शक्यता वर्तवली जात आहे.
यावेळी महाराष्ट्रातील सात विद्यमान राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ संपत आहे. त्यामध्ये शरद पवार, रामदास आठवले, फौजिया खान, रजनी पाटील, प्रियांका चतुर्वेदी, धैर्यशील पाटील आणि भागवत कराड यांचा समावेश आहे. निवडणूक कार्यक्रमानुसार 5 मार्च ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत, 6 मार्च रोजी अर्जांची छाननी, 9 मार्चपर्यंत उमेदवारी मागे घेण्याची संधी, तर 16 मार्च रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 4 या वेळेत मतदान होऊन त्यानंतर मतमोजणी होणार आहे.

Related Articles

Back to top button