रायगड जिल्ह्यात ‘हीटवेव्ह’चा इशारा; पुढील पाच दिवस काळजी घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

सत्यमेव जयते न्युज डॉट कॉम
अलिबाग |
गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या उष्णतेमुळे रायगड जिल्ह्यातील नागरिक हैराण झाले आहेत. पुढील ४ ते ५ दिवसांत उष्णतेची लाट येण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. या काळात तापमान सरासरीपेक्षा मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता असून नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार काही ठिकाणी तापमान ४५ अंश सेल्सिअसच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे, असे स्पष्ट करण्यात आले आहे. विशेषतः उघड्या आकाशाखाली काम करणाऱ्या नागरिकांनी अधिक दक्षता बाळगावी.
अत्याधिक उष्णतेमुळे घुसमट, चक्कर येणे, अशक्तपणा किंवा अचानक तब्येत बिघडण्याची लक्षणे दिसल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घ्यावा, असेही सांगण्यात आले आहे. घरामध्ये योग्य वायुवीजन राहील याची काळजी घ्यावी.
दरम्यान, नागरिकांनी शरीरात पाण्याची कमतरता होऊ नये म्हणून पुरेशा प्रमाणात पाणी व द्रवपदार्थ घ्यावेत. दही, ताक, बेलफळाचा रस यांसारख्या थंड व पौष्टिक पेयांचा वापर करण्याचा सल्ला आरोग्य विभागाने दिला आहे. नागरिकांनी अफवा न पसरवता अधिकृत सूचनांचे पालन करावे आणि स्वतःसह इतरांचीही काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
______
अशी घ्या काळजी :
पुरेसे पाणी व द्रवपदार्थ नियमित प्या
सकाळी १० ते दुपारी ३ दरम्यान थेट सूर्यप्रकाश टाळा
गॅस सिलिंडर उन्हात ठेवू नका
वीजमीटरवर जास्त भार टाकू नका
एसीचा वापर आवश्यक त्या भागातच करा
२–३ तासांनी ३० मिनिटे विश्रांती घ्या
बाहेरील तापमान जास्त असल्यास एसी २४–२५°C वर ठेवा




