ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगड

अखेर गंगेत घोडं न्हालं! रायगड जिल्हा परिषदेवर महायुतीची सत्ता; अध्यक्षपदी भाजपाचे मंगेश वाकडीकर तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीचे मधुकर पाटील बिनविरोध


सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम 

अलिबाग  |

रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी भाजपचे मंगेश वाकडीकर तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे मधुकर पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. दोन्ही पदांसाठी एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांना विजयी घोषित करण्यात आल्याची माहिती अतिरिक्त जिल्हाधिकारी सुनील थोरवे यांनी दिली.
त्यानंतर लगेचच अध्यक्ष मंगेश वाकडीकर आणि मधुकर पाटील यांनी कोणती बागेतील त्यांच्या कार्यालयामध्ये पदभार स्वीकारला.
रायगड जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर जिल्ह्यात सत्तास्थापनेबाबत विविध राजकीय हालचाली सुरू झाल्या होत्या. सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप एकत्र येऊन सत्ता स्थापन करतील आणि शिवसेना (शिंदे गट) सत्तेपासून दूर राहील, असे चित्र निर्माण झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी त्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. मंत्री भरत गोगावले, आमदार महेंद्र दळवी आणि आमदार महेंद्र थोरवे यांनी तटकरे यांच्याशी राजकीय पंगा घेतल्याने जिल्हा परिषद निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात युती झाली होती. मात्र त्या युतीत शिवसेना सहभागी झाली नव्हती.
शिवसेना (शिंदे गट) सर्वाधिक 21 जागांवर विजयी झाली, तर राष्ट्रवादी काँग्रेसला 16 आणि भाजपला 15 जागा मिळाल्या. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) पाच जागांवर तर काँग्रेस दोन जागांवर विजयी झाली. एकूण 59 सदस्यसंख्या असलेल्या रायगड जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेसाठी 30 सदस्यांची आवश्यकता होती. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे मिळून 31 सदस्यांचे संख्याबळ होते. त्यांना शिवसेना उबाठा गट आणि काँग्रेसचा पाठिंबा मिळाल्याने ही संख्या 38 वर पोहोचली होती.
सत्तास्थापनेपूर्वी घोडेबाजार होऊ नये आणि सदस्यांची फूट पडू नये यासाठी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या नव्याने निवडून आलेल्या सदस्यांना गोवा येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये जवळपास महिनाभर ठेवले होते. दरम्यान, सत्ता स्थापनेच्या आदल्या दिवशी म्हणजेच 11 मार्च रोजी अंतिम निर्णय घेण्यात आला. वरिष्ठ पातळीवरून शिवसेना (शिंदे गट) यांना सत्तेत सामावून घेण्याचा निर्णय झाल्याने अखेरीस भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांची महायुती तयार झाली.
महायुतीमध्ये सत्तेचा फॉर्म्युलाही निश्चित करण्यात आला आहे. त्यानुसार सुरुवातीची सव्वा वर्षे अध्यक्षपद भाजपकडे राहणार आहे, पुढील सव्वा वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसकडे राहणार आहे, तर त्यानंतरची अडीच वर्षे शिवसेना (शिंदे गट) अध्यक्षपद भूषवणार आहे. त्यानुसार भाजपकडून अध्यक्षपदासाठी मंगेश वाकडीकर यांच्या नावाची घोषणा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केली आणि त्यांचा अर्ज दाखल करण्यात आला. तर उपाध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून मधुकर पाटील यांचा अर्ज दाखल करण्यात आला.
अर्ज दाखल करताना मंत्री आदिती तटकरे, भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, माजी आमदार अनिकेत तटकरे, शिवसेना नेत्या मानसी दळवी, विकास गोगावले, रसिका केणे, दिलीप भोईर, चंद्रकांत कळंबे, आस्वाद पाटील, चित्रा पाटील, सुधाकर घारे, अॅड. प्रवीण ठाकूर, अनंत गोंधळी यांच्यासह महायुतीचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्यान, शिवसेना (शिंदे गट) यांना महायुतीत सामील केल्यामुळे पदाधिकाऱ्यांसह अनेक नवनिर्वाचित सदस्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट नाराजी दिसून आली. वरिष्ठ पातळीवरून आदेश आल्याने अखेरीस शिंदे गटाला सामावून घ्यावे लागले. त्यामुळे नियोजन भवन येथील सभागृहात अपेक्षित जोशपूर्ण वातावरण दिसून आले नाही आणि संपूर्ण सभागृहात मूक सन्नाटा पसरल्याचे चित्र पाहायला मिळाले.
……….
मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले की, राज्यातील विविध जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये महायुतीने एकत्र येऊन काम करण्याचा निर्णय घेतला आहे. रायगडमध्येही तिन्ही पक्षांनी एकत्र येत जिल्ह्याच्या विकासासाठी काम करण्याचा निर्धार केला आहे. विविध पक्षांकडून मिळालेल्या पाठिंब्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले असून जिल्ह्याच्या प्रगतिशील वाटचालीसाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Related Articles

Back to top button