ताज्या बातम्यादेश विदेशमहाराष्ट्रमुंबईरायगडसंपादकीय

रायगडासाठी रोपवे मंजूर; फक्त 50 ते 100 रुपयात आता गडावर जाणे शक्य होणार; पण रायगड तयार आहे का लाखो शिवभक्तांसाठी? वाढणाऱ्या गर्दीचे नियोजन हीच खरी कसोटी!


सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
अलिबाग |
दुर्गराज रायगडावर महाराष्ट्र शासनाच्या मालकीचा अत्याधुनिक रोपवे उभारण्यास पुरातत्त्व विभागाने मंजुरी दिल्याने शिवभक्त आणि पर्यटकांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. नवीन रोपवे सुरू झाल्यानंतर अवघ्या 50 ते 100 रुपयांच्या  दरम्यान गडावर जाणे शक्य होणार असल्याचे रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे सध्याच्या महागड्या रोपवे दरांपासून मोठा दिलासा मिळणार आहे.
मात्र, या घोषणेपलीकडे एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. रायगड लाखो नव्या शिवभक्तांच्या वाढत्या गर्दीसाठी तयार आहे का?
आजही शिवराज्याभिषेक दिन, शिवजयंती आणि सुट्टीच्या दिवशी रायगडावर मोठ्या प्रमाणात गर्दी होते. नवीन शासकीय रोपवे सुरू झाल्यानंतर प्रवास अधिक स्वस्त होईल आणि पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत गडावरील मूलभूत सुविधांवर अतिरिक्त ताण येणार आहे.
पार्किंग व्यवस्था, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, कचरा व्यवस्थापन, आपत्कालीन आरोग्य सुविधा, सुरक्षा, गर्दी नियंत्रण आणि ऐतिहासिक वास्तूंचे संवर्धन यासाठी प्रशासनाने आतापासूनच ठोस आराखडा तयार करणे आवश्यक ठरणार आहे. अन्यथा स्वस्त रोपवेचा आनंद व्यवस्थेअभावी कमी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
याचबरोबर, नवीन शासकीय रोपव्यामुळे रायगड संवर्धनाच्या कामांनाही मोठा फायदा होणार आहे. सध्या संवर्धनासाठी लागणाऱ्या साहित्याच्या वाहतुकीवर मोठा खर्च होतो. नवीन रोपवेमुळे हा खर्च मोठ्या प्रमाणात कमी होऊन संवर्धनासाठी अधिक निधी उपलब्ध होऊ शकतो.
नवीन रोपवेचा प्रकल्प आराखडा तयार करण्याचे काम सुरू असून प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष उभारणीला सुरुवात होणार आहे. मात्र, रोपवे उभारण्याबरोबरच ‘रायगडाची क्षमता आणि सुविधा वाढविण्याचाही समांतर आराखडा तयार होणार का?’ हा प्रश्न आता तितकाच महत्त्वाचा ठरला आहे.
स्वस्त रोपवे ही नक्कीच ऐतिहासिक आणि स्वागतार्ह घोषणा आहे; पण दुर्गराज रायगडाचे वैभव, पावित्र्य आणि संवर्धन अबाधित ठेवत वाढत्या शिवभक्तांचे व्यवस्थापन करणे हीच आता शासन आणि प्रशासनासमोरील खरी परीक्षा असणार आहे.
…..

Related Articles

Back to top button