ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगड

कल्याण-डोंबिवली महापालिकेत सत्तासंघर्ष तीव्र; बहुमतासाठी ६२चा आकडा, शिंदे गट-मनसे चर्चेला वेग


सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम

कल्याण-डोंबिवली | 
कल्याण-डोंबिवली महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी ६२ नगरसेवकांचा बहुमताचा आकडा गाठणे अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. सध्या राजकीय हालचालींना वेग आला असून विविध पक्षांमधील घडामोडींमुळे सत्तासंघर्ष अधिक तीव्र झाला आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे सध्या ५३ नगरसेवकांचे संख्याबळ आहे, तर भाजपकडे ५० नगरसेवक आहेत. या निवडणुकीत ठाकरे गटाचे ११ आणि मनसेचे ५ नगरसेवक निवडून आले होते, मात्र निकालानंतर ठाकरे गटात मोठी उलथापालथ झाल्याचे चित्र दिसून आले.
ठाकरे गटाचे मधुर म्हात्रे आणि किर्ती ढोणे हे दोन नगरसेवक निकालानंतर अचानक संपर्काबाहेर गेल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. हे दोघेही शिंदे गटाच्या संपर्कात असल्याची चर्चा रंगली होती. त्यानंतर ठाकरे गट कोकण विभागीय आयुक्तांकडे आपल्या गटाची अधिकृत नोंदणी करण्यासाठी गेला असता, आणखी दोन नगरसेवक गैरहजर राहिले. या दोघांनी मनसेत प्रवेश केल्याची चर्चा सुरू झाली, ज्यामुळे ठाकरे गटाचे संख्याबळ ११ वरून थेट ७ वर आले. विशेष म्हणजे, हे दोन्ही नगरसेवक पूर्वी मनसेचेच कार्यकर्ते होते आणि त्यांनी पुन्हा मूळ पक्षात परतल्याची भूमिका घेतली आहे.
सध्याच्या घडीला हे दोन नगरसेवक आणि मनसेचे निवडून आलेले पाच नगरसेवक असे एकूण सात नगरसेवक सत्तास्थापनेसाठी निर्णायक ठरू शकतात. हे सर्व नगरसेवक शिंदे गटाला पाठिंबा देतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे नेते मनसेशी चर्चा करत असल्याचे समजते, मात्र अद्याप कोणताही अंतिम निर्णय जाहीर झालेला नाही.
ठाकरे गटाच्या चिन्हावर निवडून आलेले नगरसेवक पुन्हा मनसेत गेल्याबाबत खासदार संजय राऊत यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. कल्याण-डोंबिवलीत जे नगरसेवक गट नोंदणीसाठी उपस्थित राहत नाहीत, त्यांच्यावर अपात्रतेसंदर्भातील कारवाई सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ते कुठेही गेले असले तरी ही कारवाई थांबणार नाही, असेही त्यांनी सांगितले. तसेच, हे नगरसेवक मशाल चिन्हावर निवडून आले असल्याने पक्षनिष्ठा आणि नैतिकतेचा प्रश्न उपस्थित होत असल्याचे नमूद करत, राजकारणात नैतिकता आणि नितिमत्तेला महत्त्व दिले पाहिजे, असेही संजय राऊत यांनी ठामपणे सांगितले.

Related Articles

Back to top button