ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगड

‘तिमिरारातुनी तेजाकडे’ : कर्करोगावर मात करताना उमललेले जगण्याचे भान, स्वाती कुलकर्णींचा प्रेरणादायी प्रवास

प्राध्यापक शाम जोगळेकर यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन संपन्न


सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम

अलिबाग |

अलिबाग : कर्करोगासारख्या दुर्धर आजाराचे निदान झाल्यानंतर निर्माण होणाऱ्या भीतीवर मात करून जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्याचा मार्ग दाखविणारे ‘तिमिरारातुनी तेजाकडे’ हे केवळ आत्मकथन नसून अंधारातून प्रकाशाकडे जाणाऱ्या मानवी धडपडीची कहाणी आहे, असे प्रतिपादन प्रा. शाम जोगळेकर यांनी केले.

लेखिका स्वाती कुलकर्णी यांच्या कर्करोगावर मात करण्याच्या अनुभवावर आधारित ‘तिमिरारातुनी तेजाकडे’ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते. यावेळी त्यांनी कॅन्सरतज्ज्ञ डॉ. सुलोचना गवांदे यांच्या मराठी व इंग्रजी भाषेतील कर्करोगावरील अभ्यासपूर्ण पुस्तकांचाही संदर्भ दिला. सर्वसामान्यांना समजेल अशा भाषेत कर्करोगासारख्या विषयाची मांडणी होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

कर्करोग असो किंवा एड्स, मृत्यूची जाणीव तीव्र झाल्यानंतर माणसाचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. या अनुभवातूनच अनेकदा श्रेष्ठ साहित्याची निर्मिती होते. महान टेनिसपटू आर्थर ॲश यांच्या लेखनाचा संदर्भ देताना त्यांनी जीवन, मृत्यू आणि प्रेमाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन हृदयस्पर्शी असल्याचे सांगितले.

कर्करोगाच्या विळख्यातून यशस्वीपणे बाहेर पडलेल्या व्यक्तींनी आपले अनुभव समाजासमोर मांडून जनजागृती करावी. तसेच दानशूर व्यक्ती आणि सेवाभावी संस्थांनी कर्करोगग्रस्तांना मदत करणाऱ्या संस्थांना उदारपणे आर्थिक सहकार्य करावे, असे आवाहनही प्रा. जोगळेकर यांनी केले.

वेदनांकडे त्रयस्थ नजरेने पाहण्याची साधना

प्रारंभी लेखिका स्वाती कुलकर्णी आणि संजय कुलकर्णी यांनी प्रमुख पाहुणे व उपस्थितांचे स्वागत केले. स्वाती कुलकर्णी यांनी पुस्तकाच्या निर्मितीचा प्रवास उलगडताना २०२३ ते २०२४ या काळातील अनुभव कथन केले.

‘तिमिरारातुनी तेजाकडे’ हे केवळ आत्मकथन न राहता आत्मपरीक्षणातून आकाराला आलेली साहित्यकृती आहे. स्वतःच्या वेदनांकडे त्रयस्थ नजरेने पाहता येणे ही एक प्रकारची उत्कृष्ट साधना आहे. त्यांच्या कथनात जागोजागी सूक्ष्म विनोदाची पेरणी असून त्यामुळे गंभीर अनुभवांची मांडणीही सहज आणि परिणामकारक झाली आहे, असे डॉ. अनिल डोंगरे यांनी सांगितले.

गंभीर आजाराचे निदान झाल्यानंतर रुग्णाच्या मानसिक अवस्थेकडेही तितक्याच गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे. निदानानंतर सुरुवातीला ‘शॉक रिएक्शन’ येते. त्यातून आजार नाकारण्याची मानसिकता निर्माण होऊ शकते. मात्र, कालांतराने बहुसंख्य रुग्ण आजाराचा स्वीकार करतात. उपचार सुरू असतानाही टोकाच्या भावनिक प्रतिक्रिया निर्माण होण्याची शक्यता असते. अशा काळात चिकाटीने उपचार सुरू ठेवणे महत्त्वाचे ठरते.

उपचारानंतर रुग्ण बरा झाल्यानंतरही आजार पुन्हा उद्भवेल का, ही भीती कायम राहू शकते. त्यातून नैराश्याची भावना निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा काळात रुग्णाचा आत्मविश्वास आणि जगण्याची उमेद टिकवून ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असे डॉ. डोंगरे यांनी स्पष्ट केले.


Related Articles

Back to top button