ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगड

रायगडच्या तरुणांसाठी नोकरीचा ‘रनवे’ तयार; चित्रलेखा पाटील यांच्या प्रयत्नांना यश : आयईएसपीच्या पहिल्याच बॅचमधील सात विद्यार्थ्यांच्या करिअरने घेतले ‘टेकऑफ’

पाच हजार तरुणांना रोजगाराशी जोडण्याचे लक्ष्य; शिक्षणाला कौशल्याची जोड देत रायगडच्या तरुणांसाठी नव्या रोजगार संधींची दारे खुली


सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम 

अलिबाग | 

रायगडच्या सात तरुणांच्या करिअरने आता थेट विमानतळावरून ‘टेकऑफ’ घेतला आहे. पीएनपी एज्युकेशन सोसायटीच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील यांच्या पुढाकारातून शिक्षण, कौशल्य प्रशिक्षण आणि उद्योगक्षेत्र यांना जोडण्याच्या प्रयत्नांना पहिल्याच टप्प्यात यश मिळाले असून, आयईएसपी (इन्स्टिट्यूट फॉर एक्सलन्स इन सर्व्हिसेस अँड प्लॅनिंग), अलिबागच्या पहिल्याच बॅचमधील सात विद्यार्थ्यांची नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ग्राउंड स्टाफ पदांसाठी निवड झाली आहे.

निवड झालेल्या सात विद्यार्थ्यांमध्ये ऐश्वर्या देसाई, प्रांजली प्रसाद, नेहा पाटील, गौतमी साळुंखे, सहर्ष पाटील, भूषण टक्के आणि यश सारतंडेल यांचा समावेश आहे. हे सर्व विद्यार्थी आयईएसपीच्या अल्फा बॅचचे आहेत. त्यापैकी तिघांची ‘रेड कॅप’ तर चौघांची ‘पॅसेंजर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह (PSE)’ पदासाठी निवड झाली आहे.

या सात विद्यार्थ्यांची निवड ही केवळ सात कुटुंबांसाठी आनंदाची बातमी नसून, रायगडच्या तरुणांसाठी विमान वाहतूक क्षेत्रातील रोजगाराचे नवे दार उघडणारी घटना मानली जात आहे. विशेष म्हणजे, हे विद्यार्थी मध्यमवर्गीय कुटुंबांच्या पार्श्वभूमीतून आले असून, स्थानिक पातळीवर कौशल्य प्रशिक्षण घेऊन त्यांनी थेट विमानतळावरील रोजगाराची संधी मिळवली आहे.

 

निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव करण्यासाठी विशेष सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांचे पालक, पीएनपी एज्युकेशन सोसायटी आणि आयईएसपीचे पदाधिकारी उपस्थित होते. पहिल्याच बॅचमधील विद्यार्थ्यांना प्रशिक्षणानंतर रोजगार मिळाल्याने पालकांमध्येही समाधानाचे वातावरण होते.

चित्रलेखा पाटील यांच्या संकल्पनेतून शिक्षणाला रोजगाराची जोड देण्यावर विशेष भर देण्यात येत आहे. बदलत्या रोजगार बाजारपेठेत केवळ पारंपरिक शिक्षण पुरेसे नसून विद्यार्थ्यांना उद्योगांच्या गरजेनुसार कौशल्य प्रशिक्षण मिळणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. रायगडमधील तरुणांमध्ये मोठी क्षमता असून, योग्य प्रशिक्षण आणि दिशा मिळाल्यास ते विमान वाहतूक, हॉस्पिटॅलिटी, ग्राहक सेवा आणि इतर सेवा क्षेत्रांमध्येही मोठी झेप घेऊ शकतात, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या सात विद्यार्थ्यांचे यश म्हणजे ‘शिक्षण ते रोजगार’ या संकल्पनेची पहिली प्रत्यक्ष पावले आहेत. आयईएसपीच्या माध्यमातून विमानतळ व्यवस्थापन, विमान वाहतूक, ग्राहक सेवा, हॉस्पिटॅलिटी आणि संबंधित सेवा क्षेत्रांसाठी आवश्यक कौशल्यांचे प्रशिक्षण दिले जात आहे. प्रशिक्षणानंतर विद्यार्थ्यांना थेट रोजगाराच्या संधी मिळाव्यात, यासाठी उद्योगक्षेत्राशी समन्वय साधला जात आहे.

दरम्यान, आयईएसपीचे संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी गॅरी खन्ना यांनी येत्या तीन ते चार वर्षांत रायगडमधील सुमारे पाच हजार तरुणांना प्रशिक्षण देऊन रोजगाराशी जोडण्याचे उद्दिष्ट असल्याचे सांगितले.

“पहिल्या बॅचमधील सात विद्यार्थ्यांची निवड ही केवळ सुरुवात आहे. प्रशिक्षणाला रोजगाराशी जोडणे हा आमचा मुख्य उद्देश आहे. रायगडच्या तरुणांना विविध सेवा क्षेत्रांमध्ये संधी मिळवून देण्यासाठी उद्योगांशी समन्वय वाढवला जाणार आहे,” असे खन्ना यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, विद्यार्थ्यांचा हा ‘टेकऑफ’ आता पाच हजार तरुणांच्या रोजगारक्षमतेकडे नेणाऱ्या मोठ्या प्रवासाची पहिली पायरी ठरणार आहे.


Related Articles

Back to top button