ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगड
रायगडमध्ये ‘ति’च्या सन्मानाचा नवा अध्याय सुरु; ‘बेटी बचाव’ उपक्रमासाठी समाज ठामपणे एकवटला
लोककलेच्या माध्यमातून जनजागृतीचा प्रभाव, मुलींच्या सन्मान, शिक्षण आणि आरोग्याला प्राधान्य

सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
अलिबाग |
रायगड जिल्ह्यात ‘बेटी बचाव बेटी पढाव’ हा केवळ सरकारी नारा न राहता आता एक व्यापक जनचळवळ बनताना दिसत आहे. पथनाट्य आणि चित्ररथाच्या माध्यमातून गावागावात पोहोचलेल्या या अभियानामुळे मुलींच्या सन्मान, शिक्षण आणि आरोग्याबाबत जागृतीची नवी लाट निर्माण झाली आहे. महिला व बालविकास विभाग, रायगड जिल्हा परिषद, आरोग्य विभाग आणि जिल्हा रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच कलारंग सांस्कृतिक सामाजिक संस्थेच्या माध्यमातून 8 ते 28 मार्चदरम्यान हे जनजागृतीपर अभियान राबविण्यात आले.

या अभियानांतर्गत संपूर्ण रायगड जिल्ह्यात तब्बल 40 ठिकाणी पथनाट्य आणि चित्ररथाद्वारे प्रभावी जनजागृती करण्यात आली. अलिबाग, पेण, पनवेल, उरण, सुधागड, रोहा आदी तालुक्यांमध्ये हा उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला असून नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत या अभियानाला मोठा पाठिंबा दिला. या माध्यमातून ‘बेटी बचाव’ हा संदेश थेट जनतेपर्यंत पोहोचवण्यात आला.
गर्भलिंग निदान, स्त्रीभ्रूण हत्या रोखणे, स्त्री-पुरुष समानता, किशोरवयीन मुलींचे शारीरिक व मानसिक आरोग्य, मासिक पाळीबाबतचे गैरसमज व सुरक्षितता, तसेच गर्भलिंग निदानविरोधातील कायदे व शिक्षेबाबत माहिती देण्यात आली. यासोबतच मुलींसाठीच्या शैक्षणिक सुविधा आणि एचपीव्ही लसीकरण यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर प्रभावी पथनाट्य सादर करून समाजमनात सकारात्मक बदल घडवण्याचा प्रयत्न करण्यात आला.

या अभियानासाठी जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर, उपाध्यक्ष मधुकर पाटील, सभापती वैकुंठ पाटील, चंद्रकांत कळंबे, नारायण डामसे, रसिका केणी, गटनेते अमित नाईक, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निशिकांत पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्राची नेहुलकर आणि महिला व बालविकास कार्यक्रम अधिकारी निर्मला कुचिक यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच आरोग्य विभागाच्या विस्तार व माध्यम अधिकारी रेश्मा संकपाळ, अॅड. नीता कोळी आणि सुशील साईकर यांचे विशेष सहकार्य लाभले.

कलारंग सांस्कृतिक सामाजिक संस्थेच्या कलाकारांनी या अभियानात मोलाची भूमिका बजावली. शेखर झावरे, योगेश पाटील, विशाल गोरड, विनोद नाईक, अभिजीत चांदोस्कर, तन्वी पाटील आणि पुनम म्हात्रे यांनी विशेष परिश्रम घेतले असून संस्थेचे अध्यक्ष प्रकल्प वाणी यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला. या अभियानामुळे ‘बेटी बचाव’ हा संदेश केवळ घोषणांपुरता मर्यादित न राहता प्रत्यक्ष समाजमनात रुजत असल्याचे चित्र रायगड जिल्ह्यात पाहायला मिळत आहे.

मात्र, ‘बेटी बचाव’सारख्या अभियानातून जनजागृतीची लाट निर्माण होत असली तरी प्रत्यक्षात मुलींच्या सुरक्षिततेचे, शिक्षणात सातत्य राखण्याचे आणि आरोग्याच्या मूलभूत सुविधांचे प्रश्न अजूनही पूर्णपणे सुटलेले दिसत नाहीत. मुलींवरील अत्याचाराच्या घटना, शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर पडणाऱ्या मुलींची संख्या आणि मासिक पाळी व आरोग्याविषयी असलेली अपुरी सुविधा या वास्तवाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यामुळे जनजागृतीसोबतच या गंभीर प्रश्नांवर ठोस आणि परिणामकारक उपाययोजना कधी राबविल्या जाणार, हा प्रश्न उपस्थित होत आहे.
…..




