ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगड

कर्जतच्या टोरंट ऊर्जा प्रकल्पापासून ५ हजारांच्या मदतीपर्यंत सरकारच्या ‘शेतकरी मॉडेल’वर चित्रलेखा पाटील यांचा परखड सवाल

जमिनी विकासासाठी हव्यात; शेतकऱ्यांना मदतीचा हात मात्र आखडता!


 

सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम

अलिबाग |

कर्जत तालुक्यातील ३७७ हेक्टर जमीन टोरंट ऊर्जा  प्रकल्पासाठी हवी आहे; मात्र, दुष्काळ आणि संकटात सापडलेल्या त्याच शेतकऱ्यांना मदत देताना सरकारचा हात आखडता का, असा थेट सवाल शेतकरी कामगार पक्षाच्या प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी उपस्थित केला आहे. शेतकऱ्यांच्या जमिनी विकासासाठी हव्या असतील, तर त्यांच्या अडचणीच्या काळात त्यांना भरीव मदतीचा हातही सरकारने दिला पाहिजे. केवळ प्रकल्पांसाठी शेतकरी महत्त्वाचा आणि मदतीच्या वेळी तो निकषांच्या चौकटीत अडकवला जाणार असेल, तर सरकारच्या या ‘शेतकरी मॉडेल’वर प्रश्न उपस्थित होणारच, अशी टीका त्यांनी केली.

दुष्काळामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. उत्पादन खर्च वाढला, कर्जाचा बोजा वाढला आणि दिवाळीच्या तोंडावर कुटुंबाचा खर्च भागवण्याचे आव्हान शेतकऱ्यांसमोर उभे आहे. अशा परिस्थितीत अवघ्या पाच हजार रुपयांची मदत जाहीर करून सरकारने शेतकऱ्यांच्या नुकसानीचे गांभीर्य समजून घेतले आहे का, असा सवाल चित्रलेखा पाटील यांनी केला.

शेतकऱ्याचे नुकसान किती आणि मदत किती, याचे गणित सरकारने स्पष्ट करावे. एका बाजूला पिकांचे नुकसान, उत्पादन खर्च आणि कर्जाचा भार वाढत असताना दुसऱ्या बाजूला केवळ पाच हजार रुपयांची मदत जाहीर केली जाते. ही रक्कम शेतकऱ्याला पुढचा हंगाम उभा करण्यासाठी कितपत उपयोगी ठरणार, याचा सरकारने विचार करावा. मदत ही केवळ घोषणा न राहता प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यात वेळेत जमा झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

कर्जत तालुक्यातील ३७७ हेक्टर जमिनीवरील टोरंट ऊर्जा प्रकल्पाला स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध असल्याचा मुद्दाही चित्रलेखा पाटील यांनी उपस्थित केला. विकासप्रकल्पांना विरोध नाही; मात्र, शेतकऱ्यांच्या जमिनीशी संबंधित निर्णय घेताना त्यांना विश्वासात घेणे आवश्यक आहे. त्यांच्या आक्षेपांचे निराकरण न करता प्रकल्प पुढे नेण्याचा प्रयत्न झाल्यास संघर्ष उभा राहू शकतो, असा इशारा त्यांनी दिला.

जमिनी विकासासाठी हव्यात, पण त्याच शेतकऱ्यांच्या संकटाच्या काळात मदतीचा हात आखडता का? हा सरकारने स्वतःला विचारण्याचा प्रश्न आहे. शेतकऱ्यांच्या जमिनी, श्रम आणि योगदानातून विकास उभा राहत असेल, तर त्या विकासाचा लाभ आणि संकटाच्या काळातील संरक्षणही शेतकऱ्यांना मिळाले पाहिजे, असे चित्रलेखा पाटील यांनी सांगितले.

दरम्यान, शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांनीही दुष्काळी मदतीवरून सरकारवर निशाणा साधला. “ऐन दिवाळीच्या तोंडावर दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्यांच्या हातात भरीव मदत देण्याऐवजी अवघ्या पाच हजार रुपयांची घोषणा करून राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. शेतकऱ्यांचे झालेले नुकसान, उद्ध्वस्त झालेली पिके आणि कर्जाचा डोंगर या पाच हजार रुपयांत कसा सुटणार?” असा सवाल त्यांनी केला.

शेतकरी, कष्टकरी, विद्यार्थी आणि तरुणांच्या प्रश्नांवर शेकाप संघर्ष करत राहील. सरकारने शेतकऱ्यांच्या नुकसानीचा योग्य आढावा घेऊन तुटपुंजी नव्हे, तर पुरेशी आर्थिक मदत द्यावी; अन्यथा जनतेच्या प्रश्नांवर सरकारला जाब विचारण्यासाठी रस्त्यावरची लढाई तीव्र केली जाईल, असा इशाराही जयंत पाटील यांनी दिला.

……


Related Articles

Back to top button