क्रीडाताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगड

तिरंग्याच्या ताटात देशभक्तीचा स्वाद; अलिबागमध्ये ५० चिमुकल्यांची रंगली अनोखी पाककला स्पर्धा

अलिबाग नगरपरिषदेचा अभिनव उपक्रम; तिरंग्याच्या रंगांत खुलली विद्यार्थ्यांची पाककला


सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम 

अलिबाग |

‘हर घर तिरंगा’ अभियानाला यंदा अलिबागमध्ये चवदार आणि सर्जनशील रूप मिळाले. अलिबाग नगरपालिकेच्या शिक्षण विभागातर्फे नगरपालिका शाळा क्रमांक १ ते ६ मधील विद्यार्थ्यांसाठी तिरंगा थीमवर आधारित पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. तब्बल ५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेत विविध प्रकारचे आकर्षक, पौष्टिक आणि कल्पक पदार्थ सादर करत तिरंग्याविषयीचा अभिमान आपल्या कलाकृतीतून व्यक्त केला.

स्पर्धेत विद्यार्थ्यांनी केशरी, पांढरा आणि हिरवा या तिरंग्याच्या रंगसंगतीचा वापर करून सँडविच, इडली, सलाड, मिठाई, लाडू, केक, फ्रूट डिश, उपमा आदी अनेक पदार्थ तयार केले. प्रत्येक पदार्थामागे देशप्रेम, स्वच्छता, आरोग्य आणि भारतीय संस्कृतीचा संदेश दिसून आला. उपस्थितांनी विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे विशेष कौतुक केले.

या उपक्रमाला अलिबाग नगरपालिकेचे प्रशासन अधिकारी वाघ, शिक्षण विभाग प्रमुख बोरे, उपनगराध्यक्षा मानसी म्हात्रे, नगरसेविका अश्विनी ठोसर, योजना पाटील तसेच स्वीकृत नगरसेवक जमाल सय्यद यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले.

यावेळी परीक्षकांनी पदार्थांची मांडणी, तिरंगा संकल्पनेचा प्रभावी वापर, स्वच्छता, पौष्टिकता आणि सर्जनशीलता या निकषांवर विद्यार्थ्यांचे मूल्यमापन केले. चिमुकल्यांनी अत्यंत आत्मविश्वासाने आपल्या पदार्थामागील कल्पना उपस्थितांसमोर मांडल्याने स्पर्धेला शैक्षणिक मूल्यही लाभले.

समारोपावेळी मान्यवरांनी सहभागी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत, अशा उपक्रमांमुळे मुलांमध्ये राष्ट्रप्रेमाबरोबरच कला, कौशल्य आणि आत्मविश्वास विकसित होतो, असे मत व्यक्त केले. ‘हर घर तिरंगा’ अभियानाच्या माध्यमातून स्वातंत्र्यदिनाचा उत्साह प्रत्येक शाळेत आणि प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्याचा संकल्पही यावेळी व्यक्त करण्यात आला.
……
“तिरंगा हा केवळ आपल्या राष्ट्रध्वजाचा सन्मान नाही, तर तो प्रत्येक भारतीयाच्या संस्कारांचा आणि अभिमानाचा प्रतीक आहे. अशा उपक्रमांमधून विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, सर्जनशीलता आणि आत्मविश्वासाची जपणूक होते, हीच या स्पर्धेची खरी जमेची बाजू आहे.” — ॲड. मानसी म्हात्रे, उपनगराध्यक्षा, अलिबाग नगर परिषद
……


Related Articles

Back to top button