ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगड

फाईल फिरवू नका, संकटात मैदानात उतरा; गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाला सत्ताधाऱ्यांचा थेट इशारा

कागदावरची तयारी नको; गणेशोत्सवात व्यवस्था रस्त्यावर दिसली पाहिजे : गोगावले-तटकरे यांचा प्रशासनाला सज्जड दम, जिल्हा शांतता समितीची बैठक संपन्न


सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम

अलिबाग  |

गणेशोत्सवाच्या काळात केवळ कागदोपत्री नियोजन न करता नागरिकांना प्रत्यक्ष आणि तातडीची मदत मिळेल, अशी यंत्रणा मैदानात सज्ज ठेवण्याचे स्पष्ट निर्देश पालकमंत्री भरतशेठ गोगावले आणि महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी प्रशासनाला दिले. सरकारी यंत्रणा पोहोचेपर्यंत वेळ वाया जाऊ नये, यासाठी स्थानिक खासगी रेस्क्यू टीम्सशी आधीच समन्वय साधण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.

जिल्हा नियोजन भवनात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत वीज, पाणी, वाहतूक आणि सुरक्षेसोबतच आपत्कालीन व्यवस्थेवर विशेष भर देण्यात आला. गणेशोत्सव, दहीहंडी आणि त्यानंतरचा नवरात्रोत्सव सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणांनी आपली जबाबदारी चोख बजावावी, असे निर्देश देण्यात आले.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पर्यायी मार्गांची माहिती देणारे दिशादर्शक फलक लावण्याच्या सूचना देण्यात आल्या. इंदापूर, माणगाव, लोणेरे, पोलादपूर आदी भागांतील पर्यायी मार्गांवर आवश्यक वाहतूक मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. बिघडलेली वाहने तातडीने हटविण्यासाठी 20 टोईंग क्रेन आणि 20 रुग्णवाहिका, तसेच 25 मोटारसायकलींची व्यवस्था करण्यात आली आहे.

कोंडीत दोन-तीन तास अडकणाऱ्या महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अन्य प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी सुविधा केंद्रांची संख्या गरजेनुसार वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या. हॉटेल, रेस्टॉरंट किंवा सार्वजनिक शौचालय नसलेल्या ठिकाणी तात्पुरती शौचालये उभारण्याचेही निर्देश देण्यात आले.

आदिती तटकरे यांनी जिल्ह्यातील स्थानिक खासगी रेस्क्यू टीम्सशी प्रशासनाने पूर्वसमन्वय साधावा, अशी सूचना केली. आपत्कालीन प्रसंगी सरकारी मदत पोहोचेपर्यंत या पथकांकडून तातडीची मदत मिळू शकते, त्यामुळे त्यांची उपलब्धता निश्चित ठेवण्यावर भर देण्यात आला. शांतता समिती सदस्यांचे तीन दिवसांत पोलीस व्हेरिफिकेशन पूर्ण करून त्यांना ओळखपत्रे देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.

दहीहंडीच्या आयोजनासाठी सेफ्टी बेल्टसह आवश्यक सुरक्षा उपाययोजना पूर्ण झाल्याशिवाय परवानगी देऊ नये, अशी कठोर भूमिका घेण्यात आली. वाहतूक वळविलेल्या प्रत्येक ठिकाणी पोलीस किंवा सुरक्षा कर्मचारी तैनात करण्याचेही निर्देश देण्यात आले.

गणेशोत्सवाच्या बंदोबस्तासाठी 7 पोलीस उपनिरीक्षक, 128 पोलीस अधिकारी, 1,900 पोलीस अंमलदार, 400 होमगार्ड आणि एसआरपीएफची एक कंपनी तैनात राहणार आहे. महामार्गावर खारपाडा, खारेपाटण, वाकण, कोलाड, इंदापूर, माणगाव, लोणेरे, महाड, महाड एमआयडीसी आणि पोलादपूर येथे 10 सुविधा केंद्रे उभारण्यात येणार आहेत.

या केंद्रांवर पिण्याचे पाणी, वैद्यकीय कक्ष, पोलीस मदत कक्ष, महिला-बालकांसाठी सुविधा, वाहन विश्रांती आणि टायरमध्ये हवा भरण्याची सुविधा उपलब्ध असेल. दरम्यान, उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत 36 शांतता समिती, 30 मोहल्ला समिती, 137 गणेश मंडळे आणि 125 गावबैठका घेण्यात आल्या आहेत.


Related Articles

Back to top button