ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगड

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त रायगड जिल्हाधिकारी कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन


सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम 
अलिबाग |
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त रायगड जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी उत्साहपूर्ण वातावरणात अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून जिल्हाधिकारी कार्यालय परिसर आकर्षक फुलांच्या सजावटीने सजविण्यात आला होता. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची आठवण करून देणारी सुबक आणि लक्षवेधी रांगोळी काढण्यात आली होती. या सजावटीमुळे संपूर्ण परिसरात भक्ती, आदर आणि प्रेरणेचे वातावरण निर्माण झाले होते.
या उपक्रमासाठी चालक महेंद्र महाडिक (मयूर) यांनी विशेष पुढाकार घेतला. त्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रमाचे नियोजन अत्यंत नीटनेटकेपणाने आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडले. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी असलेली श्रद्धा आणि आदरभाव व्यक्त करण्यासाठी कर्मचाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग नोंदविला.
यावेळी महेंद्र महाडिक (मयूर), सुनीती देशपांडे, वैशाली पयर, रवींद्र दळवी, आनंद पवार, हेरंब आयरकर यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अनेक कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनी शिवरायांच्या पराक्रम, दूरदृष्टी आणि लोककल्याणकारी राज्यकारभाराचा आदर्श समोर ठेवून समाजहितासाठी कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला.
रायगड हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाशी निगडित असलेला पवित्र जिल्हा असल्याने शिवराज्याभिषेक दिनाला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन शिवरायांना अभिवादन केले. या उपक्रमातून कर्मचाऱ्यांमध्ये इतिहासाबद्दलचा अभिमान आणि राष्ट्रप्रेमाची भावना अधिक दृढ झाल्याचे दिसून आले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थित कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त करत पुढील वर्षीही अशाच उत्साहात शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्याचा निर्धार व्यक्त केला.
…..
यावेळी चालक महेंद्र महाडिक (मयूर) यांनी सांगितले की, यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमा खुर्ची अथवा तात्पुरत्या जागेवर ठेवून अभिवादन केले जात असे. मात्र राष्ट्रपुरुषांना अधिक सन्मानपूर्वक अभिवादन करता यावे, यासाठी तत्कालीन जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी यांच्याकडे कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांची तसबीर, आकर्षक सजावट आणि सुसज्ज टेबलची व्यवस्था करण्याबाबत विनंती करण्यात आली होती. त्याची दखल घेत विजय सूर्यवंशी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पहिल्या मजल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची तसबीर लावून त्या ठिकाणाचे सुशोभीकरण केले. तसेच राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमा व्यवस्थित ठेवण्यासाठी आकर्षक टेबलचीही व्यवस्था करण्यात आली. त्यामुळे आज सर्व राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमांना सन्मानपूर्वक अभिवादन करणे शक्य होत असल्याची माहिती महाडिक यांनी दिली.

Related Articles

Back to top button