ताज्या बातम्यादेश विदेशमहाराष्ट्रमुंबईरायगड

तांदूळवाडी दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांची मदत; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची श्रद्धांजली


सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम 

मुंबई, ता, 15 |
सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील तांदूळवाडी येथे पिकअप वाहन विहिरीत कोसळून आठ भाविकांचा मृत्यू झाल्याच्या दुर्घटनेबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला असून मृतांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
रांजणी गावातील भाविक म्हसवड येथील सिद्धनाथ मंदिराचे दर्शन घेऊन परतत असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने पिकअप वाहन रस्त्यालगतच्या विहिरीत कोसळले. या अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला असून सात जणांना वाचविण्यात यश आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
या घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक घटनास्थळी रवाना झाले. बचाव व मदतकार्य सुरू असल्याचे शिंदे यांनी समाजमाध्यमावरील संदेशात म्हटले आहे.
स्थानिक प्रशासनाकडून घटनेची माहिती घेऊन आवश्यक ती सर्व मदत उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.
“ही घटना अत्यंत दुःखद आहे. या दुर्दैवी दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या भाविकांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो,” असे शिंदे यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.
दरम्यान, जखमींवर उपचार सुरू असून अपघाताच्या कारणांचा अधिक तपास केला जात आहे.

Related Articles

Back to top button