ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगड
दागिन्यांसाठी अपहरण करून वृद्धेचा खून; दोन आरोपी जेरबंद,१२ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी-मांडवा सागरी पोलिसांची कारवाई

सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
अलिबाग |
रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील सारळ आदिवासीवाडी येथील एका वयोवृद्ध महिलेचे दागिन्यांसाठी अपहरण करून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी मांडवा सागरी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून सुमारे १० तोळे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.
अनदर्श हिराजी शेडगे (वय ३२) व रितेश नरेश लोहार (वय २०, दोघेही रा. तिनविरा, ता. अलिबाग) अशी अटक आरोपींची नावे आहेत.
आरोपींना ४ जून २०२६ रोजी अटक करण्यात आली असून न्यायालयाने आरोपींना १२ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली असून पुढील तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वयोवृद्ध महिला सुनंदा लक्ष्मण पाटील (रा. सारळ आदिवासीवाडी, ता. अलिबाग) या २ जून रोजी बेपत्ता झाल्याची तक्रार मांडवा सागरी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि साक्षीदारांच्या जबाबांच्या आधारे पोलिसांनी अनदर्श हिराजी शेडगे (वय ३२) व रितेश नरेश लोहार (वय २०, दोघेही रा. तिनविरा, ता. अलिबाग) यांच्यावर संशय व्यक्त केला.
चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. महिलेच्या अंगावरील सोन्याचे दागिने लुटण्याच्या उद्देशाने तिचे अपहरण करून पिकअप वाहनात नायलॉनच्या दोरीने गळा आवळून खून करण्यात आल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह महाबळेश्वर–पोलादपूर मार्गावरील आंबेनळी घाटातील खोल दरीत फेकून देण्यात आला होता.
आरोपी अनदर्श शेडगे याने दिलेल्या माहितीच्या आधारे प्रतापगड शोध व बचाव पथकाच्या मदतीने पोलिसांनी दरीतून मृतदेह हस्तगत केला. मृत महिलेची ओळख तिचा मुलगा किशोर पाटील यांनी पटवून दिली.
तपासादरम्यान आरोपींकडून अंदाजे १४ लाख २४ हजार १०० रुपये किमतीचे सुमारे १० तोळे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. तसेच खूनासाठी वापरण्यात आलेली नायलॉन दोरी आणि गुन्ह्यात वापरलेले महिंद्रा पिकअप वाहनही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
या प्रकरणी मांडवा सागरी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम १०३(१), २३८(अ), १४०(१), ६१(२) आणि ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रायगडच्या पोलिस अधीक्षक श्रीमती आँचल दलाल, अपर पोलिस अधीक्षक अभिजीत शिवथरे आणि उपविभागीय पोलिस अधिकारी माया मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली मांडवा सागरी पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक एस.व्ही. लांडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
….




