कर्जत तालुक्यातील चार सराईत गुन्हेगारांना दोन वर्षांसाठी तडीपार

सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
अलिबाग |
कर्जत तालुक्यात सातत्याने गंभीर स्वरूपाचे गुन्हे करणाऱ्या चार सराईत गुन्हेगारांना दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे. सार्वजनिक शांतता व कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी ही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
तडीपार करण्यात आलेल्यांमध्ये सुरज राम जाधव (वय २५, रा. आमराई, ता. कर्जत) हा टोळी प्रमुख असून गणेश सोमनाथ साळुंखे (वय २४), सोहेल सिद्दीकी असारी (वय २५) आणि विकी मारुती जाधव (वय ३०) हे त्याचे साथीदार आहेत. या चौघांविरुद्ध सन २०२१ ते जानेवारी २०२५ या कालावधीत कर्जत पोलीस ठाण्यात मारामारीसह विविध प्रकारचे एकूण १७ गुन्हे दाखल आहेत. संबंधित आरोपींनी टोळी तयार करून कर्जत शहर व परिसरात दहशत निर्माण केली होती तसेच आर्थिक फायद्यासाठी वारंवार मारामारी व इतर गंभीर गुन्हे केले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली. त्यामुळे नागरिकांच्या जीवित व मालमत्तेच्या सुरक्षेला धोका निर्माण होत असल्याने ही कारवाई करण्यात आली. पोलीस अधीक्षक रायगड यांच्या आदेशानुसार या चौघांना रायगड जिल्ह्यासह पुणे, मुंबई, नवी मुंबई व ठाणे जिल्ह्याच्या हद्दीतून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे. भविष्यातही समाजात दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.




