ताज्या बातम्यादेश विदेशमहाराष्ट्रमुंबईरायगड
एसयूव्हीनंतर स्क्रॅम्बलरची क्रेझ; रायगडच्या तरुणांना आकर्षित करण्यासाठी येझदी-बीएसएची दमदार एंट्री

सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
अलिबाग |
भारतीय वाहन बाजारात गेल्या काही वर्षांत एसयूव्ही कार्सनी अक्षरशः राज्य केले. शहरातील रस्ते, लांबचा प्रवास आणि खराब रस्त्यांवरही सहज धावणाऱ्या या वाहनांना ग्राहकांनी भरभरून प्रतिसाद दिला. आता हाच ट्रेंड दुचाकी क्षेत्रातही दिसू लागला असून ‘स्क्रॅम्बलर’ प्रकारच्या मोटरसायकली नव्या पिढीच्या पसंतीस उतरत आहेत. याच वाढत्या मागणीला लक्षात घेऊन येझदी आणि बीएसए या दोन ऐतिहासिक ब्रँड्सनी आपल्या नव्या स्क्रॅम्बलर बाइक्स रायगडमध्ये उपलब्ध केल्या आहेत.
मोटरसायकल क्षेत्रातील जाणकारांच्या मते, स्क्रॅम्बलर म्हणजे दुचाकी क्षेत्रातील एसयूव्ही. शहरातील दैनंदिन वापर, हायवेवरील लांब पल्ल्याचा प्रवास आणि खडतर किंवा खराब रस्त्यांवरील सफर अशा सर्व प्रकारच्या गरजा एकाच वेळी पूर्ण करण्याची क्षमता या बाइक्समध्ये असते. त्यामुळे केवळ स्टाइल नव्हे तर बहुपयोगीपणालाही महत्त्व देणाऱ्या तरुण रायडर्समध्ये या प्रकाराला मोठी पसंती मिळत आहे.
या पार्श्वभूमीवर येझदीने ‘येझदी स्क्रॅम्बलर 350’ बाजारात आणली आहे. भारतातील सर्वात हलकी 350 सीसी स्क्रॅम्बलर म्हणून सादर करण्यात आलेली ही बाइक शहरातील वाहतुकीत सहज हाताळता यावी आणि वीकेंडला साहसी सफरींचा आनंद घेता यावा, या उद्देशाने विकसित करण्यात आली आहे. नवीन लिक्विड-कूल्ड ‘कटार’ इंजिन, दमदार टॉर्क आणि जलद प्रतिसाद देणारी कामगिरी ही तिची वैशिष्ट्ये आहेत. या बाइकची सुरुवातीची किंमत 1 लाख 99 हजार 950 रुपये आहे.
दुसरीकडे, बीएसएने ‘स्क्रॅम्बलर 650’ सादर करून प्रीमियम सेगमेंटमधील रायडर्सना लक्ष्य केले आहे. भारतातील या प्रकारातील एकमेव 650 सीसी सिंगल-सिलेंडर इंजिन असलेली ही बाइक मजबूत लो आणि मिड-रेंज टॉर्कसाठी ओळखली जाते. गोल्ड स्टार कॅटालिना, ए10 स्पिटफायर आणि ए65 फायरबर्ड यांसारख्या बीएसएच्या ऐतिहासिक मॉडेल्सपासून प्रेरित असलेले तिचे डिझाइन ब्रिटिश वारशाची झलक दाखवते. या बाइकची सुरुवातीची किंमत 3 लाख 24 हजार 950 रुपये ठेवण्यात आली आहे.
क्लासिक लेजेंड्सचे सह-संस्थापक अनुपम थरेजा यांनीही स्क्रॅम्बलर बाइक्सना मोटरसायकलिंग क्षेत्रातील एसयूव्ही अशीच उपमा दिली. शहराच्या मर्यादांपलीकडे जाऊन नवीन मार्ग शोधण्याची प्रेरणा या बाइक्स रायडर्सना देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
एकेकाळी स्पोर्ट्स बाइक आणि क्रूझर यांच्यापुरती मर्यादित असलेली ग्राहकांची पसंती आता बदलताना दिसत आहे. वाहन खरेदी करताना केवळ वेग किंवा लूक नव्हे, तर विविध परिस्थितींमध्ये उपयोगी पडणारे वाहन निवडण्याकडे कल वाढत आहे. कार बाजारात जसा एसयूव्हीचा प्रभाव वाढला, तसाच प्रभाव आता मोटरसायकल क्षेत्रात स्क्रॅम्बलर प्रकाराचा दिसू लागला असून, रायगडसारख्या डोंगर, घाट आणि किनारपट्टी लाभलेल्या जिल्ह्यात या नव्या ट्रेंडला कसा प्रतिसाद मिळतो याकडे वाहनप्रेमींचे लक्ष लागले आहे.
………
स्क्रॅम्बलर म्हणजे काय?
“स्क्रॅम्बलर म्हणजे शहरातील रस्ते, महामार्ग आणि खडतर ग्रामीण मार्ग अशा सर्व प्रकारच्या रस्त्यांवर सहज धावू शकणारी बहुउपयोगी साहसी मोटरसायकल.”




