ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगड

रांगोळीत उमटला तिरंगा; अलिबागच्या मातीत रंगली देशभक्ती -अलिबागमध्ये ‘हर घर तिरंगा’ अंतर्गत खुली रांगोळी स्पर्धा उत्साहात


सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम 

अलिबाग |

स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर अलिबाग नगरपरिषदेतर्फे ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत आयोजित करण्यात आलेली खुली रांगोळी स्पर्धा बुधवारी (१२ ऑगस्ट) सकाळी उर्दू शाळेतील सभागृहात उत्साहात पार पडली. स्पर्धेत तिरंग्याच्या रंगछटांसह देशभक्तीपर संदेश आणि आकर्षक कलाकृतींच्या माध्यमातून स्पर्धकांनी राष्ट्रप्रेमाची भावना व्यक्त केली.

या स्पर्धेला अलिबाग नगराध्यक्षा अक्षया नाईक यांनी भेट देऊन स्पर्धकांच्या कलाकृतींची पाहणी केली. यावेळी नगरसेवक अश्विनी ठोसर, जमाल सय्यद आणि निवेदिता वाघमारे यांची उपस्थिती होती. नगराध्यक्षा नाईक यांनी स्पर्धकांशी संवाद साधत त्यांच्या कलाकृतींचे कौतुक केले आणि ‘हर घर तिरंगा’ अभियानाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये राष्ट्रभक्तीची भावना अधिक दृढ होत असल्याचे सांगितले.

उर्दू शाळेतील सभागृहात सकाळी १० ते १२ या वेळेत झालेल्या या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तिरंग्याचे रंग, अशोकचक्र, देशभक्तीपर प्रतिके आणि विविध संदेशांनी सभागृहातील वातावरण रंगून गेले होते.

स्पर्धेतील विजेत्यांना १५ ऑगस्ट रोजी बक्षिसे प्रदान करण्यात येणार आहेत. अलिबाग नगरपरिषदेच्या या उपक्रमामुळे स्वातंत्र्यदिनाच्या उत्सवाला कलात्मक आणि देशभक्तीपूर्ण स्वरूप प्राप्त झाले. स्पर्धेला प्रियंका वाघ यांचे सहकार्य लाभले.
……


Related Articles

Back to top button