ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगड
“होयबा दरबाराने केला घात! शेकापची ४६ वर्षांची राजवट उलथली; अलिबाग पंचायत समितीवर शिवसेनेचा भगवा”
सभापतीपदी भाग्यता नंदन पाटील तर उपसभापतीपदी प्रिया भगत यांची बिनविरोध निवड

सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
अलिबाग |
पंचायत समितीवर तब्बल ४६ वर्षे टिकून असलेली शेतकरी कामगार पक्षाची लाल राजवट अखेर कोसळली. आजच्या पंचायत समिती सभापती निवडणुकीत त्यावर शिक्कामोर्तब झाले. सभापतीपदी भाग्यता नंदन पाटील तर उपसभापतीपदी प्रिया भगत यांची बिनविरोध निवड झाली. अलिबाग पंचायत समितीवर शिवसेनेचा भगवा दिमाखात फडकला आहे.
चुकीची रणनीती, आत्ममग्न झालेले नेतृत्व आणि आजूबाजूला जमलेला ‘होयबाबा’ दरबार या घातक मिश्रणामुळेच शेकापचा बालेकिल्ला ढासळल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. वास्तव परिस्थितीकडे दुर्लक्ष करत हवेतल्या राजकारणावर भर देणाऱ्या नेतृत्वाला मतदारांनी या निवडणुकीत स्पष्ट धडा शिकवल्याचे बोलले जात आहे.
अलिबाग पंचायत समितीच्या निवडणुकीत १४ पैकी तब्बल १२ जागा जिंकत शिवसेना स्पष्ट बहुमताने सर्वात मोठा पक्ष ठरला. तर भारतीय जनता पार्टीला आणि शेतकरी कामगार पक्षाला अनुक्रमे प्रत्येकी केवळ १ जागेवर समाधान मानावे लागले. त्यामुळे सभापती आणि उपसभापती पदावर शिवसेनेचे उमेदवार बसणार हे आधीपासूनच निश्चित झाले होते.
निवडणूक निर्णय अधिकारी मुकेश चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समिती सभागृहात झालेल्या बैठकीत सभापतीपदासाठी भाग्यता पाटील आणि उपसभापतीपदासाठी प्रिया भगत यांचेच अर्ज प्राप्त झाल्याने दोघांचीही बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.
अलिबाग पंचायत समितीवर गेल्या ४६ वर्षांपासून शेकापची एकहाती सत्ता होती. मात्र यावेळी झालेल्या निवडणुकीत शेकापचा दारुण पराभव झाला. एकेकाळी बलाढ्य मानला जाणारा पक्ष एका जागेवरच थांबला, ही वस्तुस्थिती त्यांच्या नेतृत्वासाठी मोठा राजकीय धक्का मानली जात आहे.
पंचायत समितीत निवडून आलेल्या सदस्यांमध्ये जयंत वार्डे, संतोष निगडे, प्रकाश पाटील, शरद गोंधळी, शैलेंद्र पाटील, कृष्णा लोभी, भाग्यता पाटील, अंकिता घरत, प्रियांका गुंजाळ, वैशाली करवटे, प्रिया भगत, स्नेहा रूत (शिवसेना), प्रियदर्शनी पाटील (भाजप) आणि अंजली पाटील (शेकाप) यांचा समावेश आहे.
मतदारांमधून असंतोषाचे स्पष्ट संकेत मिळत असतानाही शेकापने त्याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले, आणि त्याची मोठी राजकीय किंमत आज त्यांना चुकवावी लागली, असेही बोलले जाते.
एकेकाळी रायगडच्या राजकारणात प्रभावी असलेला शेकाप पक्ष अलिबागसारख्या बालेकिल्ल्यातूनच उखडला जाणे, हे कोणत्याही पक्षासाठी मोठे धक्कादायक वास्तव आहे. ४६ वर्षांची सत्ता एका निवडणुकीत गमावणे हे शेकापच्या राजकीय प्रवासातील सर्वात मोठे राजकीय वळण ठरत आहे.
आता या पराभवातून शेकापच्या वरिष्ठांनी आत्मपरीक्षण करून पुढील राजकीय वाटचाल ठरवणे गरजेचे आहे, अन्यथा पक्ष नावापुरताही उरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, नव्या नेतृत्वाच्या निवडीनंतर शिवसेना कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष साजरा केला. यावेळी जिल्हाप्रमुख राजा केणी, जिल्हा परिषद सदस्या मानसी दळवी, जिल्हा परिषद सदस्य दिलीप भोईर आणि अनंत गोंधळी यांनी नवनिर्वाचित सभापती व उपसभापती यांचे अभिनंदन केले.




