ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगड

संयमाचा कडेलोट; जनतेच्या भावनांची धग आंदोलनाला धार देणार — अनंत गोंधळी

४ दिवसांत काम सुरू करा, नाहीतर रस्त्यावर उतरून हिशोब — शिवसेनेचा इशारा; सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन


सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम 
अलिबाग  |
आता संयमाचा कडेलोट झाला आहे! अलिबाग–रोहा रस्त्याच्या दुरवस्थेमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांच्या भावना पेटल्या असून, “आता शब्द नाही, थेट रस्त्यावर उतरून हिशोब केला जाईल,” असा संतप्त इशारा रायगड जिल्हा परिषद सदस्य अनंत गोंधळी यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिला आहे.
अलिबाग–रोहा मार्ग म्हणजे प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा जिवंत पुरावा ठरला आहे. ठिकठिकाणी खोल खड्डे, उखडलेली डांबरीकरणाची पट्टी आणि धुळीच्या ढगांमुळे नागरिकांचा प्रवास जीवघेणा झाला आहे. रोजच्या प्रवासात अपघाताची टांगती तलवार डोक्यावर असल्याने संतापाचा उद्रेक आता रस्त्यावर होण्याच्या तयारीत आहे.
वारंवार तक्रारी, निवेदने, पाठपुरावा… पण प्रशासन ढिम्म! ठेकेदार बिनधास्त! अशा निष्क्रियतेचा पर्दाफाश करत गोंधळी यांनी थेट इशारा दिला आहे की, “जनतेच्या जीवाशी खेळ करणाऱ्यांना आता रस्त्यावरच उत्तर दिलं जाईल!”
निवेदनानुसार, रा.मा. १९१ वरील अलिबाग–रोहा रस्त्याचे कि.मी. ०/०० ते ८५/६०० पर्यंतचे काम मे. जे.आर.ए. अलिबाग रोड प्रोजेक्ट प्रा. लि. या कंपनीकडे आहे. मात्र, महिन्यांपासून कामाचा मागमूस नाही. स्थानिक आमदार महेंद्र दळवी यांनी विधानसभेत आवाज उठवला, तरीही प्रशासनाने कानाडोळा केल्याची जोरदार टीका करण्यात आली आहे.
इतकंच नाही, तर अलिबाग–रोहा मार्गाला जोडणाऱ्या नवघर पुलाचे कामही ठप्प आहे. पावसाळा तोंडावर असताना ही अवस्था म्हणजे नागरिकांच्या सहनशीलतेची थट्टाच!
“४ दिवसांत काम सुरू करा… नाहीतर खांनाव येथे शिवसेना आपला स्टाईलने आंदोलन करेल! रास्ता रोको नव्हे, तर संपूर्ण यंत्रणा ठप्प करू!” असा थेट इशारा देत गोंधळी यांनी प्रशासनाला अंतिम अल्टिमेटम दिला आहे.
नुकतेच निवडून आलेले गोंधळी आता आक्रमक अवतारात दिसत असून, “जनतेसाठी लढायचं तर भिडायचंच!” हा स्पष्ट संदेश त्यांनी दिला आहे. प्रशासन आणि ठेकेदारांच्या निष्काळजीपणाविरोधात आता रणशिंग फुंकले गेले आहे. “हा रस्ता नाही, तर जनतेच्या सहनशीलतेचा अंत आहे… आणि आता त्याचा स्फोट होणारच!” अशी तीव्र प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांमधून उमटत आहे.

Related Articles

Back to top button