ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगड
चार दिवसांतच राजकीय प्रयोग फसला; भगव्याचा रंग लाल झाला,’ब्रँड प्रशांत नाईक’वर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब
गैरसमज दूर होताच गोविंद बंदरातील तीन कार्यकर्त्यांसह कुटुंबीयांची शेकापमध्ये घरवापसी; शेतकरी भवनमध्ये जल्लोषात स्वागत

सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
अलिबाग |
गोविंद बंदर परिसरातील काही कार्यकर्त्यांनी गैरसमजुतीतून चार दिवसांपूर्वी शिवसेना (ठाकरे गट) गाठला होता. मात्र हा राजकीय निर्णय अल्पकाळ टिकला आणि गैरसमज दूर होताच संबंधित कार्यकर्त्यांनी कुटुंबीयांसह पुन्हा शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला. त्यामुळे अलिबागचे माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान बांधकाम सभापती प्रशांत नाईक यांच्या नेतृत्वावरील कार्यकर्त्यांचा विश्वास पुन्हा अधोरेखित झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
बुधवारी (दि. १) शेतकरी भवन येथील सभागृहात प्रशांत नाईक यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा उत्साहात पार पडला. कार्यकर्त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी शेकाप महिला आघाडी प्रमुख ॲड. मानसी म्हात्रे, कामगार आघाडी प्रमुख प्रदीप नाईक, जिल्हा सहचिटणीस ॲड. गौतम पाटील, तालुका चिटणीस सुरेश घरत, माजी नगराध्यक्ष सतीश प्रधान, माजी नगरसेविका वृषाली ठोसर, संजना किर, महेश शिंदे, पाणी सभापती अनिल चोपडा, नगरसेविका सुषमा पाटील, ॲड. निवेदिता वाघमारे, ॲड. ऋषीकेश माळी, जमाल सय्यद, अलिबाग पुरोगामी युवक अध्यक्ष विक्रांत वार्डे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
इस्माईल मोहद्दीन सय्यद, सल्लाउद्दीन गायसुद्दीन शाह आणि कामरुद्दीन गयाउद्दीन शाह यांनी चार दिवसांपूर्वी गैरसमजुतीमधून शिवसेना (ठाकरे गट) प्रवेश केला होता. मात्र प्रशांत नाईक यांच्याशी चर्चा झाल्यानंतर गैरसमज दूर झाले आणि त्यांनी आपल्या कुटुंबीयांसह पुन्हा शेतकरी कामगार पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. पक्षात पुनरागमन करताना त्यांनी शेकापशी असलेली आपली जुनी नाळ कायम असल्याची भावना व्यक्त केल्याचे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
या घरवापसीकडे केवळ पक्षप्रवेश म्हणून नव्हे, तर प्रशांत नाईक यांच्या सातत्यपूर्ण जनसंपर्क, कार्यकर्त्यांशी असलेले वैयक्तिक नाते आणि संघटनात्मक नेतृत्वावर पुन्हा उमटलेला विश्वास म्हणून पाहिले जात आहे. त्यामुळे अलिबाग शहरातील राजकीय समीकरणांमध्ये या घडामोडीची चर्चा सुरू झाली आहे.
अल्पावधीत झालेली ही घरवापसी स्थानिक पातळीवर एक संदेश देऊन जाते. कार्यकर्त्यांना केवळ पक्षाचे नाव नव्हे, तर त्यांच्याशी सातत्याने संवाद साधणारे नेतृत्वही महत्त्वाचे वाटते.
……..

“गोविंद बंदर परिसरातील आमचे जुने कार्यकर्ते काही गैरसमजुतीमुळे दुसऱ्या पक्षात गेले होते. संवादातून त्यांचा गैरसमज दूर झाला आणि ते अवघ्या चार दिवसांत पुन्हा आपल्या पक्षात परतले. शेतकरी कामगार पक्षातील कार्यकर्त्यांचे नाते हे केवळ राजकारणाचे नसून विश्वासाचे आहे. ही घरवापसी त्याच विश्वासाची पावती आहे,-प्रशांत नाईक, माजी नगराध्यक्ष,अलिबाग
……




