ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगड
शेकापचा ‘संयुक्त लढा’ – अस्तित्वाचा रणसंग्राम की सत्ता हादरवणारा ज्वालामुखी?

फडशा
आविष्कार देसाई
सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
रायगड : एकेकाळी लाखोंच्या गर्दीने सत्ताधाऱ्यांच्या सिंहासनाला हादरा देणाऱ्या शेतकरी कामगार पक्षाने (शेकाप) पुन्हा एकदा आंदोलनाची वज्रमुठ आवळली आहे. नवी मुंबई विमानतळ बाधित भूमिपुत्रांच्या हक्कासाठी तो एकवाटला आहे. पण आजच्या या रणांगणात चित्र वेगळं आहे, कारण या वेळी शेकापला लढा लढण्यासाठी शिवसेना (उबाठा), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि काँग्रेस यांसारख्या पक्षांना सोबत घ्यावं लागत आहे.

मग प्रश्न उभा राहतो, शेकापची ताकद खरंच क्षीण झाली आहे का, की हा “संयुक्त लढा” म्हणजे सत्तेच्या पाया हादरवणारा नव्या समीकरणांचा उदय? उत्तर काहीही असो, भूमिपुत्रांच्या न्यायहक्कासाठी उचललेलं हे पाऊल शेकापच्या इतिहासात पुन्हा एकदा धगधगत्या संघर्षाची ठिणगी ठरो!
नवी मुंबई विमानतळ प्रकल्पात स्थानिकांना नोकरीत प्राधान्य मिळावं, या मागणीसाठी शेकाप पुन्हा रस्त्यावर उतरणार आहे. अलिबागमधील शेतकरी भवन येथे शनिवारी (दि. ४) झालेल्या बैठकीत विराट मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला.

शेकाप सरचिटणीस जयंत पाटील म्हणाले की,
“या विमानतळासाठी १२ हून अधिक गावे उठवली गेली. हजारो एकर जमीन घेतली गेली. भूमीपुत्रांना रोजगार देण्याचं आश्वासन देऊनच ही जमीन दिली गेली होती. आता त्या आश्वासनाची अंमलबजावणी झाली नाही, तर आम्ही विमान उडू देणार नाही!”
पाटील पुढे म्हणाले, “उद्घाटनाच्या दिवशीच या विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचं नाव जाहीर झालं पाहिजे. अन्यथा जनतेचा रोष थोपवता येणार नाही.”
जेएनपीटी प्रकल्पाच्या वेळी साडेबारा टक्के जमीन देण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं, पण ते आजवर अपूर्ण राहिलं. त्याच चुकांची पुनरावृत्ती नको, असा इशारा जयंत पाटील यांनी दिला.
शेकाप जिल्हा चिटणीस सुरेश खैरे, सहचिटणीस ॲड. गौतम पाटील, अनिल पाटील, सुरेश घरत, नरेश म्हात्रे, अनिल पाटील, ॲड. विजय पेढवी, संजय पाटील आदींसह विविध आघाड्यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेकापने या लढ्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी चर्चा केली असून, शिवसेना (उबाठा), राष्ट्रवादी (शरद पवार गट) आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांची साथ मिळवल्याचा दावा केला आहे.
त्यामुळे नवी मुंबई विमानतळाचा प्रश्न केवळ रोजगारापुरता मर्यादित न राहता राजकीय अस्तित्वाच्या संग्रामात रूपांतरित झाला आहे.
“एकेकाळचा आंदोलनप्रिय शेकाप आता आघाड्यांच्या आधारावर लढतोय. हे संघटनशक्तीचं पुनरुज्जीवन आहे का, की अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न?”
हा प्रश्न आता थेट जनतेसमोर आहे.
विमानतळाच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर हा आंदोलनाचा ज्वालामुखी नेमका कोणत्या दिशेने फुटतो, हे पुढील काही दिवसांत स्पष्ट होईल.
……




