ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगड
लाल वज्रमुठीसमोर प्रशासन गुडघ्यावर; चित्रलेखा पाटील यांच्या मागणीला यश, १५ लाखांच्या मदतीचे आश्वासन
खानाव पुल दुर्घटनेत मृत्यू शेतकऱ्याच्या कुटुंबासाठी शेकापचा आक्रमक लढा; अधिकाऱ्यांना धरले धारेवर

सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
अलिबाग |
खानाव पुल दुर्घटनेत शेतकरी चांगु कमळू घरत यांचा जीव गेल्यानंतरही प्रशासन शांतच होते. मात्र, चित्रलेखा पाटील यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरत “जबाबदारीपासून पळ काढू देणार नाही,” अशी भूमिका घेताच सरकारी यंत्रणात गुडघ्यावर आली आणि त्यांना निर्णय घ्यावा लागला. मृताच्या कुटुंबासाठी १५ लाखांच्या मदतीचे आश्वासन मिळणे हा केवळ आर्थिक निर्णय नसून, जनतेच्या दबावापुढे प्रशासनाला झुकावे लागल्याचा पहिला टप्पा असल्याची भावना परिसरात व्यक्त होत आहे.
खानाव पूल दुर्घटनेची माहिती मिळताच चित्रलेखा पाटील यांनी मृत शेतकऱ्याच्या कुटुंबीयांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले. त्यानंतर त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलावून पुलाच्या निकृष्ट अवस्थेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. मृताच्या कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत मिळाली पाहिजे, अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली.

या आक्रमक पाठपुराव्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंत्यांनी मृताच्या कुटुंबाला १५ लाख रुपयांच्या आर्थिक मदतीचे आश्वासन दिले. त्यामुळे एका शेतकऱ्याच्या मृत्यूनंतर प्रशासनाला जबाबदारीची जाणीव करून देण्यात शेकापच्या संघर्षाची भूमिका निर्णायक ठरल्याची प्रतिक्रिया स्थानिकांकडून व्यक्त होत आहे.
स्थानिक नागरिकांच्या मते, जर हा प्रश्न केवळ सरकारी फाईलपुरता मर्यादित राहिला असता, तर मदतीचा निर्णय इतक्या तातडीने झाला नसता. लोकप्रतिनिधी म्हणून चित्रलेखा पाटील यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरत मृताच्या कुटुंबासाठी न्यायाची मागणी लावून धरली आणि त्यातूनच मदतीची घोषणा झाली, अशी भावना नागरिकांमध्ये आहे.
या घटनेने केवळ एका कुटुंबाला आर्थिक मदतीचे आश्वासन मिळाले असे नाही, तर सामान्य माणसाच्या प्रश्नासाठी लोकप्रतिनिधी रस्त्यावर उतरला तर प्रशासनालाही निर्णय घ्यावा लागतो, हा संदेशही गेला आहे. त्यामुळे “एका मृत्यूने प्रशासन जागे झाले; पण एक नेत्या लढल्या म्हणून न्यायाची पहिली पायरी गाठली,” अशी चर्चा आता खानाव परिसरात होत आहे.

दरम्यान, शेकापने या प्रकरणात केवळ आर्थिक मदतीवर समाधान न मानता, पुलाच्या निकृष्ट कामाची उच्चस्तरीय चौकशी, दोषींवर कठोर कारवाई आणि भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणीही केली आहे. स्थानिकांच्या मते, खरा न्याय तेव्हाच मिळेल, जेव्हा दोषींवर कारवाई होईल आणि अशा निष्काळजीपणामुळे पुन्हा कोणाचाही जीव जाणार नाही.
……




