‘रेड ४८ अवर्स’ची लढाई; रायगडसाठी मंत्रालयाचा ‘वॉर रूम’ मोड, स्वयंसेवी संस्थांनाही मैदानात उतरवण्याची तयारी!

सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
मुंबई |
रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांवर पावसाचे संकट अधिक गडद होत असताना राज्य सरकारने पुढील ४८ तासांना ‘क्रिटिकल विंडो’ मानत आपत्ती व्यवस्थापनासाठी युद्धपातळीवरील तयारी सुरू केली आहे. मंत्रालयातील राज्य आपत्कालीन कार्य केंद्रातून महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी पूरस्थितीचा सविस्तर आढावा घेत प्रशासन, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) आणि स्थानिक स्वयंसेवी संस्थांमध्ये समन्वय वाढवण्याचे निर्देश दिले.

भारतीय हवामान विभागाने रायगड आणि रत्नागिरीसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. संभाव्य पूरस्थितीचा सामना करण्यासाठी सर्व यंत्रणांना सज्ज राहण्याची आदेश प्रशासनाने दिले आहेत. महाड येथे NDRFची तुकडी तैनात ठेवण्यात आली असून, सुधागड आणि रोहा परिसरात तातडीने मदतकार्य करता यावे यासाठी १४५ अतिरिक्त जवान उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे.
या बैठकीतील सर्वाधिक महत्त्वाचा निर्णय म्हणजे आपत्ती व्यवस्थापनात स्वयंसेवी संस्थांचा सक्रिय सहभाग. पूरकाळात सातत्याने मदतकार्य करणाऱ्या कर्जत आणि खोपोलीतील सेवाभावी संस्थांशी शासनाने थेट समन्वय साधला असून, आवश्यक संसाधने उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गरज पडल्यास रायगड जिल्ह्यातील इतर भागांमध्येही या संस्थांची मदत घेण्यात येणार आहे. सरकारी यंत्रणेसोबत स्थानिक स्वयंसेवकांची ताकद जोडण्याचा हा प्रयत्न पूरस्थितीतील बचाव आणि मदतकार्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतो.
मंत्री आदिती तटकरे यांनी राज्य आपत्कालीन कार्य केंद्रातून संपूर्ण परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले असून, जिल्हा प्रशासनाला कोणतीही परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ प्रतिसाद देण्याच्या सूचना दिल्या आहेत. सर्व सुरक्षा आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा पूर्ण क्षमतेने सज्ज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, अनावश्यक प्रवास टाळावा, पाण्याखाली गेलेले रस्ते, पूल आणि नदी-नाल्यांच्या परिसरात जाणे टाळावे तसेच प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहनही मंत्री तटकरे यांनी केले.
पुढील ४८ तास रायगड आणि रत्नागिरीसाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जात असून, प्रशासनाची तयारी, स्वयंसेवी संस्थांचा सहभाग आणि नागरिकांची सतर्कता यांची खरी कसोटी याच कालावधीत लागणार आहे.





