ताज्या बातम्यामनोरंजनमहाराष्ट्रमुंबईरायगड

“लयीवर स्वार झालेले शब्द; जेथे शब्द गातात, तेथे गजल जन्म घेते – पांढरपट्टे”

पनवेल येथे ज्येष्ठ गजलकार ए. के. शेख यांच्या सहस्त्रचंद्रदर्शन सोहळ्यानिमित्त गजलची लय,  द्विपदींची ताकद आणि समाजाशी असलेले नाते अधोरेखित


सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
पनवेल |
गजल हा कवितेचाच एक प्रभावी प्रकार असून, तिच्या वृत्तबद्धतेमुळे गजलला विशेष लयबद्धता प्राप्त होते आणि हीच लयबद्धता तिला जनमानसाशी जोडते, असे प्रतिपादन गजलकार दिलीप पांढरपट्टे यांनी केले.
पनवेलमधील ज्येष्ठ गजलकार ए. के. शेख यांच्या ८०व्या वाढदिवसानिमित्त आयोजित सहस्त्रचंद्रदर्शन सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. गजल ही केवळ साहित्यिक अभिव्यक्ती नसून ती समाजाशी संवाद साधणारे प्रभावी माध्यम आहे, असेही त्यांनी नमूद केले.
पांढरपट्टे पुढे म्हणाले की, जसे संत तुकाराम महाराजांचे अभंग त्यांच्या लयबद्धतेमुळे भाषणांमध्ये उदाहरण म्हणून वापरले जातात, त्याचप्रमाणे गजलमधील शेरही अनेकजण आपल्या भाषणांमध्ये सहजपणे वापरतात. या शेरांमध्ये असलेली सहजता आणि भावस्पर्शी ताकद गजलला अधिक प्रभावी बनवते.
रविवारी (दि. २९ मार्च) श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ, मार्केटयार्ड, पनवेल येथे हा सोहळा पार पडला. यावेळी ‘गजल कळ्याफुलांची’ या प्रातिनिधिक गजलसंग्रहाचे तसेच डॉ. सुभाष कटकदौंड यांच्या ‘पण थांबणे जमलेच नाही’ या गजलसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पनवेलचे माजी नगराध्यक्ष सईद मुल्ला होते. व्यासपीठावर सत्कारमूर्ती ए. के. शेख, आयोजन समिती प्रमुख रोहिदास पोटे, संपादक डॉ. सुभाष कटकदौंड, दिवाकर वैशंपायन, ॲड. माधुरी थळकर, गणेश म्हात्रे, संदीप बोडके, प्रकाशक प्रभाकर पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सईद मुल्ला यांनी ए. के. शेख यांच्या मृदू स्वभावाचे कौतुक करताना, पनवेलमधील धार्मिक तणावाच्या काळात त्यांनी कवी म्हणून दिलेल्या योगदानाचा विशेष उल्लेख केला. रोहिदास पोटे यांनी ए. के. शेख यांना समन्वयवादी, सश्रद्ध आणि सत्शील गजलकार म्हणून गौरविले.
कार्यक्रमाची सुरुवात दीपाली सुशांत व शबाना मुल्ला यांच्या ईशस्तवनाने झाली. गणेश म्हात्रे यांनी प्रास्ताविक केले. प्रकाशक प्रभाकर पवार यांनी ‘गजल कळ्याफुलांची’ या संग्रहाची पार्श्वभूमी सांगितली, तर डॉ. सुभाष कटकदौंड यांनी संग्रह निर्मिती प्रक्रियेचा आढावा घेतला. दिवाकर वैशंपायन यांनी सहस्त्रचंद्रदर्शन सोहळ्याचे महत्त्व स्पष्ट केले.
यावेळी ए. के. शेख यांचा त्यांच्या शिष्यपरिवारातर्फे मानपत्र देऊन सपत्नीक सन्मान करण्यात आला. सहस्त्रचंद्रदर्शन सोहळ्यानिमित्त ८० दीप प्रज्वलित करून त्यांचे औक्षण करण्यात आले.
दुसऱ्या सत्रात आयोजित गजल मुशायऱ्यात राज्यभरातील तसेच गुजरातमधील गजलकारांनी सहभाग घेत आपल्या गजल सादर केल्या.
वैशिष्ट्यपूर्ण गजलसंग्रहाची नोंद
‘गजल कळ्याफुलांची’ या प्रातिनिधिक संग्रहामध्ये ११६ गजलांचा समावेश असून, प्रत्येक गजल वेगवेगळ्या वृत्तात रचलेली आहे. त्यामुळे ११६ वेगवेगळी वृत्ते हाताळणारा हा संग्रह वैशिष्ट्यपूर्ण ठरला आहे. यामध्ये ७ शुभेच्छा गजलांचाही समावेश करण्यात आला आहे.
……

Related Articles

Back to top button