ताज्या बातम्यादेश विदेशमहाराष्ट्रमुंबईरायगडसंपादकीय
दळवींच्या ‘लोकसभा भगव्या’ घोषणेवर अनिकेत तटकरेंनी उघडला ‘दिल्ली कनेक्शन’चा पिटारा!
“मदतीसाठी दिल्लीवाऱ्या आता खासदार सुनील तटकरेंनाच आव्हान; आमदार अनिकेत तटकरेंचा आमदार महेंद्र दळवींना थेट सवाल!”

फडशा
सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
आविष्कार देसाई
रायगडच्या राजकारणात महायुतीतील अंतर्गत धुसफूस पुन्हा एकदा उफाळून आली असून, शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांच्यावर केलेल्या टीकेला आमदार अनिकेत तटकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. दळवींनी आगामी काळात रायगड लोकसभेवर शिवसेनेचाच भगवा फडकेल, असा दावा करत तटकरे कुटुंबाला मोठा राजकीय झटका देण्याची भाषा केली. मात्र, या घोषणेनंतर आमदार अनिकेत तटकरेंनी आमदार दळवींच्या कथित ‘दिल्ली कनेक्शन’चा पिटारा उघडत त्यांच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
महेंद्र दळवी यांनी राष्ट्रवादी हा नेहमी खोडा घालणारा पक्ष असल्याचे सांगत, राष्ट्रवादीला आम्ही गणतीतच पकडत नाही, अशी टीका केली. तसेच भाजप आणि शिवसेनेचे विचार जुळत असल्याचे सांगत रायगडमध्ये तिन्ही पक्षांनी एकत्रितपणे काम करण्याच्या समीकरणावरही त्यांनी सवाल उपस्थित केले.
दळवींच्या या वक्तव्याचा कर्जत येथील एका कार्यक्रमानंतर समाचार घेताना अनिकेत तटकरे यांनी त्यांच्या भूमिकेतील कथित विसंगतीवर बोट ठेवले. विधानसभा निवडणुकीच्या काळात मदतीसाठी खासदार सुनील तटकरे यांच्याकडे किती वेळा फेऱ्या मारल्या, याची माहिती असल्याचा दावा त्यांनी केला. एवढेच नव्हे, तर जिल्हा परिषद निवडणुकीनंतर पत्नी मानसी दळवींना अध्यक्षपद मिळावे यासाठीही दळवींनी तटकरे यांच्याकडे दिल्लीवाऱ्या केल्याचे सांगत अनिकेत तटकरेंनी दळवींना आत्मपरीक्षणाचा सल्ला दिला.
दळवींच्या वक्तव्यामुळे महायुतीतील ‘एकत्रित लढाई’चा मुखवटा पुन्हा एकदा गळून पडल्याची चर्चा सुरू झाली आहे. राज्यात महायुतीचे सरकार असताना रायगडमध्ये मात्र घटक पक्षच एकमेकांच्या राजकीय अस्तित्वाला आव्हान देत असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे, लोकसभेवर भगवा फडकविण्याचा दावा करणाऱ्या दळवींना प्रत्युत्तर देताना अनिकेत तटकरेंनी थेट त्यांच्या पूर्वीच्या राजकीय गरजांचा संदर्भ देत ‘राजकारणात सोयीची मैत्री आणि सोयीचा विरोध’ या भूमिकेवरच निशाणा साधला आहे.
आता दळवींच्या ‘भगवा’ घोषणेपेक्षा अनिकेत तटकरेंनी उपस्थित केलेला ‘मदत घेतली की विरोध केला?’ हा सवाल रायगडच्या राजकारणात अधिक चर्चेचा ठरत आहे. विधानसभा असो वा जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे समीकरण, राजकीय मदतीसाठी तटकरेंची दारे ठोठावल्याचा दावा आणि त्यानंतर त्याच कुटुंबावर थेट हल्ला या कथित राजकीय विरोधाभासाचा हिशेब तटकरे गटाने मांडण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत सामना केवळ पक्षांमध्ये न राहता ‘कोण कोणाच्या मदतीने पुढे गेले आणि आता कोण कोणाला आव्हान देत आहे?’ या हिशेबावर रंगण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दळवी-तटकरे संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हे असून, ‘लोकसभा भगवा’च्या घोषणेला ‘दिल्ली कनेक्शन’ने उत्तर देत अनिकेत तटकरेंनी रायगडच्या राजकारणातील जुने हिशेब चुकते करण्यास सुरुवात केली असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
शिवसेनेने अलिबागसह इतर विधानसभा मतदारसंघांत तटकरे यांना निवडून आणण्यासाठी ताकद लावली, तसेच अनिकेत तटकरे यांच्या विजयातही शिवसेनेचा मोठा वाटा राहिला, हे नाकारता येणार नाही. पण हा हिशेब एकतर्फी नव्हता; तटकरे यांनीही निवडणुकीच्या मैदानात शिवसेनेला तितकीच राजकीय साथ दिली आहे, हेही तेवढेच ठोस वास्तव आहे. त्यामुळे आज एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडताना कालची साथ सोयीस्करपणे विसरणे कुणालाही शोभणारे नाही. राजकारणात भूमिका बदलू शकतात, समीकरणे बदलू शकतात; मात्र एकमेकांच्या विजयासाठी उभे राहिल्याचा इतिहास पुसता येत नाही. हा इतिहास दळवींनी आणि तटकरे यांनी दोघांनीही लक्षात ठेवणे तितकीच गरजेचे आहे.



